आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रा. नीरज हातेकर यांचे निलंबन अखेर रद्द,विद्यार्थी आंदोलनापुढे विद्यापीठ प्रशासन झुकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक नीरज हातेकर यांचे निलंबन वाढत्या दबावामुळे रद्द करण्याची नामुष्की मुंबई विद्यापीठावर ओढवली. हातेकर यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेत त्यांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय शनिवारी पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला.
पत्रकार परिषदेत चुकीची माहिती देऊन विद्यापीठ आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका हातेकर यांच्यावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ठेवला होता. त्या आधारावर कुलगुरू राजन वेळुकर यांनी हातेकर यांना 20 डिसेंबर रोजी निलंबित केले होते.


या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले होते. हातेकरांना समाजाच्या विविध स्तरांमधूनही पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाची कोंडी झाली होती. गेला महिनाभर विद्यापीठाच्या कलिना कँपसला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवला होता. कुलपती के. शंकरनारायणन यांनी कुलगुरूंना याचा जाब विचारला होता. मुख्यमंत्री चव्हाण यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती.
आम आदमी पार्टीने तर याप्रकरणी राजभनासमोर निदर्शने केली होती. शिवसेनेही हातेकरांना पाठिंबा दर्शवला होता. लेखक, कलावंत, कार्यकर्ते यांनीही विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर धरणे धरले होते. प्रसिद्धिमाध्यमांनी हातेकर प्रकरण लावून धरत विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकर यांच्या हुकूमशाही कारभाराविरुद्ध टीकेची झोड उठवली होती.
निलंबन प्रकरणाचा गवगवा झाल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाची पुरती कोंडी झाली होती. शनिवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. त्यात हातेकर यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे विद्यापीठाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, हातेकर यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश डी. जी. देशपांडे यांना नियुक्त करण्यात आले आहे.


लढाई जारी राहील
माझी लढाई निलंबन रद्द करण्यापुरती नव्हती. विद्यापीठाच्या कारभाराबाबत मी एकूण 16 मुद्दे उपस्थित केले आहेत. कुलगुरू राजन वेळुकर यांची बोगस पीएच.डी. त्यांचे बनावट शोधनिबंध, नॅकसाठी चुकीची माहिती देणे, विद्यापीठाचे घसरलेले स्थान यांचा त्यात अंतर्भाव आहे. त्याची उत्तरे मिळेपर्यंत लढाई सुरूच राहील. - प्रा. नीरज हातेकर


हातेकरांच्या आरोपात तथ्य नाही
डॉ. हातेकर यांनी उपस्थित केलेल्या 16 मुद्यांमध्ये तथ्य नसताना संस्था, विद्यार्थी आणि लोकभावनेचा विचार करून अन्याय झाल्याची भावना दूर करण्यासाठी निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कुलगुरूंनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


कुलगुरूंची पुरती कोंडी
प्रा. हातेकर यांचे निलंबन रद्द केले असले तरी त्यांनी उपस्थित केलेल्या 16 मुद्यांची उत्तर मिळेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहिल, अशी भूमिका मुंबई विद्यापीठातील युसीडीई या विद्यार्थ्यांच्या संघटनेने घेतलेली आहे. त्यामुळे हातेकरांचे निलंबन रद्द झाले तरी विद्यापीठ परिसर धगधगत राहण्याची शक्यता आहे.