आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Hit And Run Case: Prosecution Rejects Salman Khan’s Defence Of Not Driving Car

हिट अँड रन: सलमानचे ते सर्व दावे खोटे ठरणार? सोमवारच्या सुनावणीकडे लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 2002 साली मुंबईत झालेल्या हिट अँड रन प्रकरणात सलमान खान व त्याच्या ड्रायव्हरने केलेला दावा साफ खोटा असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिल प्रदिप घरत यांनी सेशन कोर्टात केला आहे. त्या रात्री अपघात झाला तेव्हा मी गाडी चालवत नव्हतो व आपण मद्यपानही केले नव्हते असा दावा अभिनेता सलमान खानने कोर्टासमोर केला होता. तर सलमानचा ड्रायव्हर अशोककुमार सिंह यानेही अपघाताच्या वेळी आपणच लॅण्डक्रूझर गाडी चालवत असल्याचा युक्तिवाद कोर्टासमोर केला होता. मात्र, या खटल्यातील सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी सलमान व त्याच्या ड्रायव्हरचा दावे फेटाळून लावले आहेत. खटला अंतिम टप्प्यात आलेला असताना अशोक सिंहची ड्रायव्हर म्हणून एण्ट्री होणे यामागे संशयाचा धूर निघतो असेही अॅड. घरत यांनी कोर्टात सांगितले.
वांद्रेतील सेशन कोर्टात बुधवारी या खटल्याची आणखी एक सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टात सरकारी वकिल यांनी कोर्टासमोर युक्तीवाद करून सलमान व अशोककुमार खोटा दावा करीत असल्याचे सांगितले. घरत म्हणाले, हा खटला गेल्या 13 वर्षापासून सुरु आहे. आता हा खटला अंतिम टप्प्यात आलेला असतानाच अशोककुमार सिंह याची या प्रकरणात एण्ट्री करण्यात आली आहे. हा साक्षीदार खरा नसून तो ओढूनताणून कोर्टात हजर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याच्या जबाबावर कोर्टाने विश्‍वास ठेवू नये, अशी विनंतीही न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांना केली.
गेली अनेक वर्षे हा खटला कोर्टात रेंगाळलेला आहे. या काळात आरोपी सलमानने अशोक सिंह याचा एकदाही उल्लेख केलेला नाही. अशोक सिंह हा सलमानची गाडी चालवत होता, असे कॉन्स्टेबल रवींद्र पाटील अथवा सलमानच्या बॉडीगार्डनेदेखील या काळात सांगितलेले नाही.
अॅड. घरत यांनी कोर्टाचे आणखी काही मुद्यांकडे लक्ष वेधले. घरत पुढे म्हणाले, वांद्रे सेशन कोर्टात सुनावणी सुरू होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे असे असताना याआधी कधीही सलमनाने मी गाडी चालवत नव्हतो व अशोक सिंह गाडी चालवत होता असा असा दावा केला नाही़. त्यामुळे ते सिद्ध करण्यासाठी बचाव पक्षाने स्वतंत्र साक्षीदार तपासला नाही़. उलट स्वत: साक्षीदार म्हणून साक्ष देणार का, हा कोर्टाचा प्रस्तावदेखील सलमानने नाकारला़ होता. तसे झाले असते तर साक्ष दिल्यानंतर त्याची उलट तपासणी झाली असती व त्याचे पितळ उघडे पडले असते, असा युक्तिवाद अ‍ॅड. घरत यांनी केला आहे.
गाडीचा टायर फुटल्याने अपघात झाल्याचे सलमानचे म्हणणे साफ खोटे असून सलमानची गाडी (लॅण्डक्रूझर) अत्याधुनिक आहे. गाडीत काहीही बिघाड झाल्यास त्याची सूचना तत्काळ चालकाला मिळते त्यामुळे सलमान जे सांगत आहे ते खोटे असल्याचे घरत यांनी सांगितले. दिवंगत पोलिस हवालदार रवींद्र पाटील हा अपघात झाला त्या वेळी झोपला होता, असा दावा सलमानने कोर्टात केला होता. दरम्यान, या घटनेची तक्रारच रवींद्र पाटील यांनी नोंदवली असल्याने तो झोपला होता हे सलमानचे म्हणणे खोटे असल्याचे सिद्ध करते असेही घरत यांनी कोर्टाला सांगितले.
दरम्यान, येत्या सोमवारी (6 एप्रिल) घरत पुढील युक्तीवाद करणार आहेत. यावेळी सलमान खानला उपस्थित राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सलमानला कोणतेही कारण सांगून कोर्टात अनुपस्थित राहता येणार नाही असेही कोर्टाने सलमानच्या वकिलाला बजावले आहे. सलमान खानला वाचविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरु झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, या खटल्यातील आतापर्यंत नोंदवलेल्या साक्षी मान्य केल्यास सलमानला कोणीही वाचवू शकत नाही. सलमान व त्याचा ड्रायव्हर अशोक सिंह यांच्या जबाबानंतरही अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत. त्याची उत्तरे सलमानने समाधानकारक न दिल्यास त्याने केलेले दावे खोटे ठरणार असून तो या प्रकरणात उघडा पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
वांद्रे येथे 2002 मध्ये घडलेल्या घटनेत एकाचा बळी गेला होता तर इतर 5 जण जखमी झाले होते. सलमान या खटल्यात दोषी ठरल्यास सलमानला त्याला 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.