आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडी संघटनांशी चर्चा पुन्हा फिसकटली, मुंबईत आज शक्तिप्रदर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी अंगणवाडी कर्मचारी संघटनांबरोबर दुसऱ्यांदा केलेली चर्चाही फिसकटली. सरकारने  दाेन दिवसांपूर्वी या कर्मचाऱ्यांना दीड हजार रुपयांची मानधन वाढ देण्याची घाेषणा केली हाेती, मात्र ही तुटपुंजी वाढ संघटनेला मान्य नाही. दरम्यान, या पार्श्वभूमीवर बुधवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी मेळावा मुंबईत होणार अाहे. अपेक्षित मानधनवाढ मिळेपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे.  

राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका अाणि मदतनीस ११ सप्टेंबरपासून संपावर आहेत. संपात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एकूण आठ संघटनांचा सहभाग आहे. त्यातील एका संघटनेला हाताशी धरून मंत्री पंकजा मुंडे अंगणवाडी सेविकांना दीड हजार, मदतनीस यांना हजार रुपयांची तर मिनी अंगणवाडी सेवकांना १२५० रुपयांची मानधनवाढ जाहीर करत २२ सप्टेंबर रोजी संप मिटल्याचा दावा केला होता.  मात्र, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या सात संघटनांनी मुंडे यांनी जाहीर केलेली पगारवाढ अमान्य करत संप चालूच ठेवला होता. त्या संघटनांशी मुंडे यांनी मंगळवारी पुन्हा चर्चा केली.    
 
अंगणवाडी सेविकांच्या संघटनांचा मुंबईतील आझाद मैदानावर बुधवारी (ता.२७)  ठरल्याप्रमाणे राज्यव्यापी मेळावा होईल. त्यास २० हजार सेविका, मदतनीस हजर राहणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती अंगणवाडी कृती समितीच्या नेत्या शुभा शमीम यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.    

२३ हजार अंगणवाड्या सुरू, ११ हजार सेविका रुजू : पंकजा
नाशिक- ‘अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीची पूर्ण मागणी राज्याच्या सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही. तरीही, मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून मुख्य सेविकांच्या ५ हजारांच्या मानधनात ६,५००, मदतनिसांच्या मानधनात अडीच हजारांवरून ३५०० आणि मिनी अंगणवाडी  सेविकांच्या मानधनात एक  हजारांवरून १२५० रुपये वाढ शासनाने केली आहे. त्यासाठी ३११.३३ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे.  यास काही संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यापैकी ११,०८६ सेविका रुजू झाल्या असून २३,५३३ अंगणवाड्या सुरू झाल्या आहेत. हा आकडा ५० हजारांच्या घरात जाईल असा मला विश्वास वाटतो’, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. संघटनांशी आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. त्यांनी संप मागे घ्यावा. हा पोषणाचा विषय आहे. यातून होणारे नुकसान भरून निघणारे नाही. जिथे अंगणवाड्या सुरू झालेल्या नाहीत तेथेही आम्ही पर्यायी व्यवस्था केली आहे. तेथे पोषण आहाराचे वाटप सुरळीत सुरू आहे. सध्याच्या स्थितीत वित्त विभाग आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्याशिवाय आम्ही कोणत्याही निर्णयापर्यंत येऊ शकत नाही, असेही मुंडे यांनी सांगितले.

पुढील स्‍लाइडवर वाचा, कुलूप फोडून उघडल्या जाताहेत अंगणवाड्या...

 
बातम्या आणखी आहेत...