आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prove The Crime And Remove The Royalty, Tawade Challenges The Shinde

आरोप सिद्ध करा अन् भाजपची मान्यता काढा; तावडेंचा शिंदे यांना आव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशात भगव्या दहशतवादासाठी प्रशिक्षण देत असल्याचा बिनबुडाचा आरोप करण्यापेक्षा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी याबाबत पुरावे द्यावेत.निवडणूक आयोगाला ते सादर करून आमच्या पक्षाची मान्यता काढून घ्यावी, असे प्रतिआव्हान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी दिले.

देशात भगवा दहशतवाद पसरवण्यासाठी राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप दहशतवादाचे प्रशिक्षण देत असल्याचा खळबळजनक आरोप शिंदे यांनी कॉँग्रेसच्या शिबिरात केला होता.त्यावर तावडे म्हणाले, की दहशतवादाला जात किंवा धर्म नसतो, त्यामुळे आपल्याला शिंदे यांची कीव करावी वाटते. भाजप दहशतवाद पसरवत नाही तर दहशवादाचा मुकाबला करून त्याला सडेतोड उत्तर देतो.

सोलापुरात प्रतिमा दहन
संतप्त संघ व भाजपच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सोलापुरातील राजवाडे चौकात शिंदे यांच्या प्रतिमेचे दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना रोखले व ताब्यात घेतले.

सुशीलकुमार शिंदेची लाज वाटते : राऊत
शिंदे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनीही तोफ डागली आहे. ‘सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे याबाबत काही पुरावे असतील तर त्यांनी ते दाखवायला हवेत. पुराव्यांशिवाय आरोप करणे गैर असून त्यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीला असे बोलणे शोभत नाही. शिंदे हे महाराष्ट्रातून केंद्रात गेलेले नेते असल्याबद्दल आपल्याला लाज वाटते,’ अशा शब्दात राऊत यांनी संताप व्यक्त केला.