आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरीसाठी 1 हजार कोटींची तरतूद; 22 एप्रिलपर्यंतची नोंद झालेली सर्व तूर घेणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील नाफेडच्या खरेदी केंद्रांवर २२ एप्रिलपर्यंत नोंद झालेली तूर खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तूर खरेदी करताना ती शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांच्या मालकीची आहे, याचा बारकाईने तपास करण्यात येणार आहे. त्यासाठी सॅटेलाइट इमेजरी तंत्राचा वापर करून संबंधित शेतकऱ्याने शासनाकडे दिलेली तूर प्रत्यक्षात लागवड केली होती किंवा नाही याची पडताळणी केली जाईल आणि व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
मंत्रालयात मंगळवारी तूर खरेदीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. पणनमंत्री सुभाष देशमुख, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, मुख्य सचिव सुमीत मल्लिक व विविध विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या वेळी  मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील खरेदी केंद्रांवर २२ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांनी आणलेली सर्व तूर राज्य शासन खरेदी करणार असून यासाठी एक हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गेल्या दहा वर्षात प्रथमच ५०५० रुपये हमी भाव देऊन या वर्षी सर्वाधिक तूर खरेदी करण्यात आली आहे. तूर खरेदीची मुदत १५ मार्चवरून १५ एप्रिल करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली होती. त्यानंतरही तूर राहिल्याने ही मुदत २२ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली.यंदा देशात एकूण ११ लाख टन तूर खरेदी झाली असून यापैकी राज्यात सुमारे ४० टक्के म्हणजेच चार लाख टन आतापर्यंत तूर खरेदी केली आहे. कर्नाटक राज्याने दोन लाख टन, तेलंगणा १.६ लाख टन, गुजरात १.२५ लाख टन, मध्यप्रदेश ८५ लाख टन तूर खरेदी केली आहे. राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून आणखी १० लाख क्विंटल तूर खरेदी करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
 
पाचपट अधिक तूर उत्पादन
यंदा १५.३३ लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी होऊन एकूण २०३ लाख क्विंटल उत्पादन झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच पट अधिक उत्पादन झाले. तूर जास्त आल्याने भाव पडले म्हणून सरकारने ५०५० हमी भावाने नाफेड, एफसीआय व एसएफएसीच्यावतीने पणन महासंघ, विदर्भ पणन महासंघ, आदिवासी विकास मंडळ आणि महाएफपीसी या संस्थांमार्फत तूर उत्पादक जिल्ह्यांत तुरीची खरेदी सुरु करण्यात आली होती.
 
बारदाना वेळेवरच खरेदी केला- सुभाष देशमुख : बारदाना न मिळाल्याने तूर साठवता आली नाही असे म्हणणे चुकीचे आहे. राज्य सरकारने आतापर्यंत ४० लाख बारदाना दिला असून अजून १० लाख बारदाना विकत घेतला जाणार आहे. तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होईल ही बाब लक्षात घेऊनच डिसेंबरमध्येच बारदाना घेण्याचे आदेश देण्यात आले होते असेही सुभाष देशमुख यांनी सांगितले.
 
आणखी दहा लाख बारदाना खरेदीचेही आदेश
१० लाख टन क्विंटल तुरीचे दिले टोकन
आतापर्यंत राज्यात नाफेडच्या वतीने दोन लाख ५८ हजार ३४१ शेतकऱ्यांची १८३९ कोटी रुपयांची ४० लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून शेवटच्या दिवशी म्हणजेच २२ एप्रिल रोजी खरेदी केंद्रावर आलेल्या दहा लाख क्विंटल तुरीसंदर्भात शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहेत.
 
...तर व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई!
-शेतकऱ्यांऐवजी खरेदी केंद्रावर व्यापाऱ्याने तूर आणल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाची कडक कारवाई केली जाईल.’
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 
शिवसेना पुन्हा सरसावली श्रेयासाठी
प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्र्यांना बैठकीचे विषय पाठवले जातात. ते पाहून एखाद्या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी शिवसेनेचे मंत्री लगेचच बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देतात आणि आपल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्याचे जाहीर करत असल्याचा अनुभव अाजवर अालेला अाहे. त्याचीच पुनरावृत्ती मंगळवारी दिसली. तूरीबाबत मंगळवारी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे श्रेयही याचमुळे शिवेसना घेऊ पाहात आहे.  मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची तूर खरेदी सुरु ठेवावी अशी आग्रही मागणी केली. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मागणी केल्यानेच मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्याचे शिवसेना मंत्री सांगू लागले अाहेत.
 
व्यापाऱ्यांनी लाटला प्रतिक्विंटल ३५० रु. नफा
- काही शेतकऱ्यांनी नाफेडकडून उशिरा पैसे मिळत असल्याने व्यापाऱ्यांना ४७०० रुपयांनी तूर विकली असून आता तेच व्यापारी त्या शेतकऱ्याच्या सात बारावर नाफेडकडे तूर विकण्यास येत असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्याने दिली. 

- क्विंटलमागे ३५० रुपये नफा कमवून व्यापारी तूरीचा साठा करून ठेवत आहेत. तूरीची कमतरता उद‌्भवल्यास जास्त दराने तूर विकण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे तूर खरेदीवर विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
 
असे फसले नियोजन
गरज दीड कोटी बारदान्याची, मागणी फक्त ३० लाखांचीच!
तुरीचे विक्रमी पीक आणि घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हाेऊ नये म्हणून सरकारने ५०५० रुपये हमीभावाने नाफेडमार्फत तुरीची खरेदी सुरू केली हाेती. परंतु पीक पेरा व काढणी या दोन्ही टप्प्यांवरील उत्पादनाचा अंदाज न अाल्यामुळे ऑक्टोबरमध्ये सरकारने ५ लाख टन तूर खरेदीचे नियाेजन करण्याएेवजी नेहमीप्रमाणे १ लाख ५० हजार टनांच्याच खरेदीचे नियाेजन केले. परिणामी एकूण तूर खरेदीसाठी दीड कोटी बारदान्यांची गरज असताना ऑक्टोबरमध्ये फक्त ३० लाख बारदान्यांची मागणी नाेंदवली. त्यामुळे बारदाने कमी पडले व खरेदी ठप्प झाली. 
 
Exclusive: कृषीच्या उत्पन्नावरही आयकर लावा : विवेक देवरॉय
http://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-santosh-thakur-interview-the-vivek-devroy-5583399-NOR.html
 
गरज दीड काेटी बारदान्यांची, पहिली मागणी 30 लाखांचीच; बारदान्यांच्या टंचाईमुळे तूर खरेदी रखडली
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-need-one-and-a-half-times-the-first-demand-is-only-30-lakhs-5583449-NOR.html
 
जळगावात 11 हजार क्विंटल तूर पडून; नाफेडने नाकारलेली तूर व्यापाऱ्यांकडे
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-11-thousand-quintals-of-turf-fall-in-jalgaon-5583451-NOR.html
 
बातम्या आणखी आहेत...