आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनातनवर बंदीबाबत माझे सरकार गंभीरच, माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘सनातनवरील बंदीबाबत आपले सरकार पूर्णत: गंभीर होते. मात्र केंद्रानेच गंभीरता का दाखवली नाही, याबद्दल मला कल्पना नाही’, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान, ‘सनातनवर बंदीचा प्रस्तावच आपल्याकडे आला नव्हता,’ असा दावा करणारे माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचेही त्यांनी खंडन केले.

‘दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या शिफारशीवरून आम्ही एप्रिल २०११ मध्ये केंद्र सरकारकडे सनातन व संबंधित संस्थांवर बंदीची शिफारस केली होती. त्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम होते. त्यांनी या संदर्भात काही अधिक माहिती आणि स्पष्टीकरण राज्य सरकारकडून मागवले. त्यानुसार आम्ही ती माहिती केंद्राकडे पाठवली. सप्टेंबर २०११ मध्ये बंदीची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. तेथे बाजू मांडताना केंद्र सरकारच्या वकिलाने राज्याचा खुलासा प्राप्त होताच ४५ दिवसात बंदीबाबत निर्णय घेऊ असे जानेवारी २०१३मध्ये उच्च न्यायालयाला सांगितले. या उत्तराला आज दोन वर्षे झाली, मात्र अद्याप राज्याने पाठविलेल्या खुलाशावर कोणताही केंद्राने निर्णय घेतलेला नाही.

केंद्राकडून उत्तर आले नाही
सन २०१४ मध्ये केंद्राने सनातनबद्दल पुन्हा माहिती मागवली आणि आम्ही तातडीने पाठवलीही. मात्र आजवर केंद्राचे काहीही उत्तर नाही. तसेच बंदीची शिफारस फेटाळल्याचेही कळविण्यात अाले नाही. त्यामुळे हा प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन आहे, असाच अर्थ आम्ही काढला. आम्ही बंदीबाबत गंभीर नसतो तर प्रस्ताव पाठवलाच नसता, अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आरोपांना अप्रत्यक्षपणे प्रत्त्युत्तर दिल. राज्याने आपल्याकडे बंदीचा प्रस्ताव दिलाच नाही’, असे शिंदे म्हणाले होते.
सुशीलकुमार शिंदे का संतापले माहीत नाही
‘सनातनच्या बंदीबाबत तत्कालिन राज्य सरकार गंभीर नव्हते,’ असा अाराेप सुशीलकुमार शिंदे यांनी केला होता. त्याबाबत चव्हाण म्हणाले, ‘जुलै २०१२ मध्ये चिदंबरम यांच्या जागी शिंदे गृहमंत्री झाले. त्यानंतर बंदीबद्दल काय कारवाई झाली? मी शिंदे यांच्यावर वैयक्तिक टीका केलेली नाही. त्यांचे नावही घेतलेले नाही. मात्र ते या विषयावरून इतके का संतापले हेच कळत नाही. मात्र शिंदेंच्या टीकेला आपण उत्तर देणार नाही. ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.’
भाजप सरकार बंदी घालू शकत नाही
केंद्रात भाजप सत्तेत येऊन वर्ष उलटले तर राज्यात लवकरच वर्ष पूर्ण होईल. या काळात या दोन्ही सरकारांनी काय केले? सनातनवर बंदी घालण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा असतो. त्यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यातील सनातनच्या कारवायांबाबत त्यांनी गुप्तचर यंत्रणेकडून काही अहवाल मागवला का? नव्या सरकारने राज्य सरकारच्या शिफारशीवर काही निर्णय घेतलेत का? अशा प्रश्नांची सरबत्तीही चव्हाण यांनी केली. भाजप हा हिंदूत्ववादी पक्ष असल्याने तो सनातनवर बंदी घालेल, असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.