आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएसआय सचिन सूर्यवंशी निलंबित : आबांची घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आमदारांशी उद्धट वर्तन करणा-या पीएसआयवर कडक कारवाई करावी म्हणून सत्ताधारी आमदारांनी दबाव वाढवल्यानंतर अखेर पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आले. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत ही घोषणा केली. आमदार निलंबनाच्या चौकशीसाठी गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली आहे. अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले.
सोमवारी कामकाज सुरू होताच सूर्यवंशी यांच्यावर कारवाईची मागणी सर्वच आमदारांनी लावून धरली. कामकाज पाच वेळा तहकूब झाले. सत्ताधारी आमदार हट्टाला पेटल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना स्वतंत्र बैठक घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा लागला. दरम्यान, पीएसआय मारहाणीची पोलिस महासंचालकांमार्फत चौकशी करावी, अशी जनहित याचिका हेमंत पाटील यांनी हायकोर्टात दाखल केली आहे.


आमदार आक्रमक
* आमदारांची एकजूट असताना त्यांची मागणी लाथाडू नका : आमदार जितेंद्र आवाड यांचा मुख्यमंत्र्यांना बैठकीत सल्ला.
* मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी मारहाण केल्याबद्दल पोलिसांवर 307 कलम लावण्यात येऊनही एकालाही अटक झाली नसल्याचा मुद्दाही सभागृहात उपस्थित झाला.
* 307 सारख्या गंभीर गुन्ह्याचे कलम असताना पोलिसांना अटक नाही आणि 353 कलम लावलेल्या दोन आमदारांवर मात्र तातडीने कारवाई का? अशी आमदारांची भूमिका होती.
* आमदारांच्या दबावामुळे सरकारला निर्णय घेणे भाग होते. शेवटी मुख्यमंत्र्यांनी दालनात बैठक बोलावली. सत्ताधारी आमदारच या मुद्द्यावर आक्रमक झाल्याने सरकारची पंचाईत.
* अखेर पीएसआयच्या निलंबनाची घोषणा झाल्यावर सभागृहात कामकाज सुरळीत झाले.


ठाकूर, कदम यांना मिळाला जामीन
पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण करणारे आमदार क्षितिज ठाकूर व राम कदम यांना महानगर दंडाधिकारी यू. बी. पडवळ यांनी प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तपास पूर्ण होईपर्यंत दोघाही आमदारांना दर बुधवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागेल. दोन्ही आमदारांना गेल्या गुरुवारी अटक झाली होती.
शुक्रवारी त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

त्याचवेळी या आमदारांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत दर बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश दंडाधिका-यांनी दिले.


काय आहे प्रकरण?
बहुजन विकास आघाडीचे आमदार ठाकूर यांना वेगाने गाडी चालवल्याबद्दल पीएसआय सूर्यवंशी यांनी पकडले होते. त्यावरून दोघांत बाचाबाची झाली होती. त्याबद्दल सूर्यवंशी यांना विधान भवनात बोलावण्यात आले तेव्हा ठाकूर व इतरांनी त्यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


आमदार निलंबनाचीही चौकशी
पाच आमदारांच्या निलंबनाची चौकशी करण्यासाठी गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दिलीप सोपल, नवाब मलिक, गिरीश बापट, आर. एम. वाणी, सदाशिवराव पाटील आणि उत्तम ढिकले यांची एक समिती नेमण्यात आली आहे. समितीला सहकार्य केले जाईल व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.