आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PSI Sachin Suryawanshi Transfer To Sangli Police Academy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील नेतेही उत्तरप्रदेशपेक्षा कमी नाही, सचिन सुर्यवंशींना ‘प्रशिक्षणा’चा रस्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उत्तर प्रदेशात गाजत असलेले दुर्गाशक्ती नागपाल या सनदी अधिकारी महिलेचे निलंबन प्रकरण देशभर गाजत असतानाच महाराष्ट्रातील राजकारणीही काही वेगळे नाहीत याची प्रचिती नुकतीच आली आहे. आमदारांशी झालेल्या वादाचा फटका वरळी वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना बसला आहे. सूर्यवंशी यांची बदली सांगली येथे पोलिस प्रशिक्षण केंद्रात करण्यात आली आहे. राजकारणांना अडचणीचे ठरलेल्या अधिर्‍यांनाच प्रशिक्षण केंद्राचा रस्ता दाखवला जातो अशीही चर्चा आहे.

विधिमंडळात आमदारांच्या रोषास बळी पडलेल्या वरळी वाहतूक शाखेचे बहुचर्चित सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची शुक्रवारी सांगलीच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली. 24 तासांच्या आत रुजू होण्याचे आदेश त्यांना बजावण्यात आले आहेत. आमदारांविरोधात सुरू असलेल्या मुंबईतील खटल्यात सूर्यवंशी यांना उपस्थित राहता येऊ नये यासाठी त्यांना सांगलीला पाठवले आहे, असा आरोप सूर्यवंशी यांच्या वकील अँड. आभा सिंह यांनी केला.

हाणामारीप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर आमदार राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांना पोलिस कोठडीची हवा खावी लागली होती, तर तीनच महिन्यांत पावसाळी अधिवेशनामध्ये आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. सूर्यवंशीही महिनाभरापूर्वी कामावर रुजू झाले होते. शुक्रवारी सकाळी सूर्यवंशी यांच्या हाती पोलिस महासंचालकांच्या कार्यालयातून निघालेला बदलीचा आदेश पडला. सूर्यवंशी यांच्या या बदलीमुळे मुंबई पोलिसांमध्ये तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे सचिन सूर्यवंशी आणि गृहमंत्री आर. आर. पाटील सांगली जिल्ह्यातील आहेत.

बदली नव्हे, सूडच !

राजकीय नेत्यांना नकोशा असलेल्या अधिकार्‍यांनाच नेहमीच पोलिस प्रशिक्षण केंद्राचा रस्ता दाखवण्यात येतो. त्यामुळे सूर्यवंशी यांची बदली म्हणजे राजकारण्यांनी घेतलेला सूड आहे, अशी मुंबई पोलिसांमध्ये कुजबुज आहे.

खटल्यातील अडथळय़ांसाठी

सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी राम कदम आणि क्षितिज ठाकूर या आमदारांवर गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणाचा खटला मुंबईतील सत्र न्यायालयात सुरू आहे. त्यात अडथळे निर्माण व्हावेत यासाठी बदली केल्याचा आरोप सूर्यवंशी यांच्या वकील अँड. आभा सिंह यांनी केला.