आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दत्ता डावजेकर यांच्या जन्मशताब्दीची 15 नोव्हेंबरला होणार सांगता; ‘स्वरसाक्षी’ ग्रंथाचे प्रकाशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लतादीदी, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर, हृदयनाथ मंगेशकर या पाचही मंगेशकर भावंडांना आयुष्यात पहिल्यांदा गाणे गाण्याची संधी देणारे प्रख्यात संगीतकार दत्ता डावजेकर ऊर्फ डीडी यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष सुरू असून त्याचा समारोप येत्या १५ नोव्हेंबरला होणार आहे. या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा स्वरसाक्षी या पहिल्या विशेष मराठी ग्रंथाचे ११ नाेव्हेंबर राेजी मुंबईत प्रकाशित होणार आहे.    

१९ सप्टेंबर २००७ रोजी वयाच्या नव्वदाव्या वर्षी डावजेकरांचे निधन झाले. जन्मशताब्दी वर्षात डावजेकर यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारे एक पुस्तक प्रकाशित करावे असा विचार नाट्यसमीक्षक रमेश उदारे व प्रा. कृष्णकुमार गावंडे यांनी केला. मात्र उदारे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे त्यांची ही इच्छा अापण पूर्ण करायची असा निर्धार गावंडे यांनी केला.    
डावजेकर यांच्यावरील हे पुस्तक कोणा एका लेखकाने लिहिलेले नाही. त्यांच्याशी उत्तम स्नेहसंबंध असलेल्या व्यक्तींना त्यांचे ‘डीडी’ कसे भावले, संगीतकार म्हणून त्यांचे काेणते मनोहर वाटले हे सारे या व्यक्तींनी लेखांमधून उलगडले अाहे.  या पुस्तकात संगीतकार अशोक पत्की, कवी प्रवीण दवणे, निवेदिका मंगला खाडिलकर, मधू पोतदार, रत्नाकर पिळणकर, चित्रपट समीक्षक व पत्रकार सुधीर नांदगावकर, संगीततज्ज्ञ डाॅ. मृदुला दाढे-जोशी, डॉ. चारुशीला दिवेकर, अंकुश चिंचणकर, सुराज साठे आदी २५ नामवंतांचे लेख अाहेत.  गायक जयवंत कुलकर्णी यांनी डावजेकरांसंदर्भात काही आठवणी लिहून ठेवल्या होत्या. त्याही या पुस्तकाच्या निमित्ताने प्रकाशित होत आहेत. डावजेकर यांच्या कन्या डॉ. अपर्णा मयेकर, दत्ता डावजेकरांचा सुपुत्र व डावजेकरांची नातवंडे यांनीही या ग्रंथात लेख लिहिले आहेत.  डावजेकरांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता सोहळा ११ नोव्हेंबर रोजी, शिवाजी नाट्यमंदिर येथे रात्री ८.०० वाजता,‘तुम्हें याद करते करते’ या विशेष संगीत मैफिलीने केला जाणार आहे.   
 
गाजलेली गाणी   
घास रोज अडतो ओठी, आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी, कुणि बाई, गुणगुणले,  गीत माझिया हृदयी ठसले, गेला कुठे बाई कान्हा, कान्हा येईना, गेला कुठे माझा राजा, ते तुझ्या हाती, जे स्वप्नी पाहिले रे, गोपाला अशा एकाहून एक अवीट गाण्यांचे संगीत डावजेकरांनी दिले. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा अादी चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजले.    
बातम्या आणखी आहेत...