आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे मेट्रोचे स्वप्न साकारणार, रेल्वेमंत्री मल्लिकार्जून खरगेंची घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पुणे मेट्रोला मान्यता मिळाल्याची घोषणा रेल्वेमंत्री मल्लिकार्जून खरगे यांनी रेल्वेच्या अंतरिम अर्थसंकल्पात केल्याने मुंबईनंतर पुण्यात मेट्रोचे स्वप्न साकारणार असल्याची प्रतिक्रीया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. त्यासोबतच राज्यासाठी नव्याने मंजूर करण्यात आलेल्या 20 नवीन गाड्यांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पुणे मेट्रोमुळे शहर तसेच परिसराचा वेगाने विकास होण्यास मदत होईल असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय नगर विकास मंत्रालयाकडून पुणे मेट्रोला मिळालेल्या मान्यतेमुळे राज्य सरकारला पुढील कार्यवाही करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूण 31.51 किलो मीटर अंतराच्या प्रस्तावित पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला यामुळे गती येणार आहे. दोन कॉरिडॉरमध्ये विभागण्यात आलेल्या या मेट्रो प्रकल्पातील पहिल्या कॉरिडॉरअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट हा 16.59 कि.मी. अंतराचा तसेच 14.92 कि.मी अंतराचा वनाज ते रामवाडी असा दुसरा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे.
या अर्थसंकल्पात एकूण 72 नवीन रेल्वे गाड्यांची घोषणा करण्यात आली. त्यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला राज्यातून नव्याने जाणाऱ्या 9 प्रिमियम रेल्वे गाड्या आणि 11 नवीन एक्सप्रेस गाड्या आल्या आहेत, या गाड्यांमुळे राज्यातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर सोय होणार आहे असे चव्हाण यांनी म्हटले आहे.