आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स्प्रेस वेवरील वेगावर कॅमेऱ्याची नजर!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई-पुणे महामार्गावर चालक बेदरकारपणे वाहने चालवतात. त्यामुळे अपघात होतात. या अपघातात आतापर्यंत अनेक बळी गेले आहेत. वेगमर्यादा निश्चित केली असतानाही ती पाळली जात नसल्याने हे अपघात होतात. असे अपघात रोखण्यासाठी आता परिवहन विभाग कडक पावले उचलत आहे. वाहतूक विभागाच्या वेग नियंत्रण वाहनांवर मागे आणि पुढे आता व्हिडिओ कॅमेरे बसवण्यात येणार असून वेग मर्यादेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी दिली. या वेळी परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, परिवहन आयुक्त शाम वर्धने, मुंबई वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलिस उपायुक्त अनिल कुंभारे उपस्थित होते.

एक्स्प्रेस वेवर प्रायोगिक तत्त्वावर ही मोहीम राबवण्यात येणार असून त्यानंतर संपूर्ण राज्यभरात ही योजना राबवण्यात येणार आहे. रावते म्हणाले, द्रुतगती मार्गावर अपघातांची संख्या वाढत असल्याने वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी या मार्गावर वाहनांची तपासणी करण्याचे निर्देश तपासणी पथकाला दिले होते. वाहन तपासणीसाठी वायुवेग पथकाच्या वाहनांवर मागे-पुढे व्हिडिओ कॅमेरे बसवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यात प्रथमच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड यांनी १६ ते २१ जूनदरम्यान कॅमेऱ्यांद्वारे वाहनांची तपासणी केली. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लेन कटिंग/ विहित वेगमर्यादेचे उल्लघंन केलेल्या ११६५ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी ७५० वाहनमालकांना घरपोच नोटिसा देण्यात आल्या आहेत. तर उर्वरितांना नोटिसा पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे. ज्या ठिकाणी वाहनमालक घरी उपलब्ध नसल्यास त्यांच्या घरावर दर्शनी भागात नोटीस लावण्यात येणार आहे.

वाहतूक काही काळ बंद
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याच्या परिसरातील दरड काढण्याच्या कामाला बुधवारी सुरुवात आली. त्यामुळे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली. मार्गावर रोड ब्लॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी बारा ते साडेतीन यादरम्यान वाहतूक बंद राहिल.एक्स्प्रेस वे वर चार ते पाच ठिकाणी दरड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे या दरडी काढण्याचे सुरू करण्यात आले. या वेळेत महामार्गावरुन प्रवास टाळावा, असे आवाहन एमएसआरडीसीने केले आहे.
बातम्या आणखी आहेत...