आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकहून पुण्यासाठी विमानसेवेचे अखेर \'टेकऑॅफ\', 50 मिनिटांवर आला प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/पुणे- नाशिक-पुणे ही बहुप्रतीक्षित विमानसेवा अखेर आजपासून सुरु झाली. सी-प्लेन करिता प्रसिद्ध असलेल्या मेहेर कंपनीकडून नाशिक-पुणे-नाशिक अशी सेवा दिली जाणार आहे. आज सकाळी पावने दहाच्या सुमारास नाशिकातील ओझर विमानतळावर खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अनिल कदम यांच्या उपस्थितीत या विमानसेवेचे उद‌्घाटन केले. त्यानंतर या विमानाने नाशिकहून पुण्याकरिता उड्डाण केले. पुण्यात लोहगाव विमानतळावर ते पावणे आकराच्या सुमारास पोहचले.
आजपासून पुढील सोमवारपर्यंत (पहिल्या आठवड्याकरिता) दुहेरी प्रवासाकरिता 7,499 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. 31 जुलैपर्यंत एकेरी प्रवासभाडे 5,999 रुपये, तर दुहेरी प्रवासभाडे 8,999 रुपये आकारण्यात येणार असल्याचे कंपनीने या पूर्वीच स्पष्ट केले आहे. सध्या ही सेवा आठवड्यातील तीन दिवस उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी तीन दिवस विमानसेवा सुरुवातीला उपलब्ध असेल. सकाळच्या सत्रात दोन वेळा व सायंकाळच्या सत्रात दोन वेळा हे विमान उड्डाण भरेल. 9 आसनी असलेल्या या विमानामुळे नाशिकमधील उद्योजक व व्यावसायिकांना फायदा होणार आहे. हे विमान 50 मिनिटांत नाशिक-पुणे अंतर कापेल. रोडने या मार्गासाठी 5 तास जातात. या विमान सेवेकरिता उत्तम प्रतिसाद मिळत असून, पहिल्या दिवशीच्या फे-यांची सर्व बुकिंग झाली असून, ऋचा जायखेडकर या पहिल्या प्रवासी ठरल्या.
नियोजित वेळापत्रकानुसार ओझर विमानतळावरून सकाळी 9.45 वाजता नाशिकहून पुण्याकरिता हे विमान उड्डाण भरेल. सकाळी 10.35 वाजता लोहगाव विमानतळावर उतरेल. सकाळी 11 वाजता पुण्याहून नाशिककडे परतेल. सकाळी 11.50 वाजता ते ओझरला पोहचेल. सायंकाळी 5.30 नाशिकहून उड्डाण भरेल आणि 6.20 वाजता पुण्यात पोहचेल. पुण्याहून 6.50 वाजता प्रयाण करेल आणि 7.40 वाजता नाशिक विमानतळावर पोहचेल.
अखेर उड्डाण भरले-

जूनमध्ये मागील मुहूर्ताच्या आदल्या दिवशी मुंबईत प्रचंड पाऊस होऊन आर्द्रता वाढल्याने विमानाचे नाशिककडे उड्डाण भरणे मुश्कील होते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कंपनीने ही सेवा तात्पुरती स्थगित केली होती. अखेर आज नाशिकहून पुण्यासाठी विमानाने उड्डाण भरले. यासाठी रविवारी दुपारीच ओझर विमानतळावर सी-प्लेन दाखल झाले होते.