आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीचा आखाडा: पुण्याला प्रतीक्षा उमेदवारांची!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होण्याची चिन्हे असताना पुण्यात मात्र अजून सर्वपक्षीय शांतता आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असेल, यावर कॉँग्रेस व भाजप हे प्रमुख पक्ष परस्परांवर लक्ष ठेवून आहेत.विद्यमान खासदार सुरेश कलमाडी यांना निलंबित केल्यामुळे कॉँग्रेससमोर उमेदवार निवडीचे आव्हान आहे. कॉँग्रेसचा उमेदवार न ठरल्याने भाजपनेही उमेदवाराची घोषणा रोखून धरली आहे. दुसरीकडे ‘मनसे’च्या गोटात पूर्ण शांतता आहे. नवख्या आम आदमी पार्टीने (आप) मात्र प्रा. सुभाष वारे यांना उमेदवारी देवून प्रचारही सुरू केला आहे.


कलमाडींच्या तुरुंगवासामुळे काँग्रेसची चांगलीच बदनामी झाल्याने व मोदी लाटेमुळे यावेळी लोकसभा जिंकण्याचा विश्वास भाजपच्या गोटात आहे. कलमाडी सक्रिय नसल्याने पुणे कॉँग्रेसची अवस्था नेतृत्त्वहीन झाली आहे. स्वत:ला उमेदवारी मिळणार नसेल तर कुटुंबातील सदस्याला किंवा सर्मथकाला उमेदवारी मिळावी, यासाठी कलमाडी प्रयत्नशील आहेत. कलमाडी यांच्या पसंतीचा उमेदवार रिंगणात येणार असेल तर भाजपकडून गिरीष बापट यांना उमेदवारी मिळण्याची अधिक शक्यता आहे.


काँग्रेसने आमदार विनायक निम्हण यांना तिकीट दिल्यास भाजप अनिल शिरोळे यांना उमेदवारी देईल, असे सांगितले जाते. भाजपकडून आमदार गिरीष बापट आणि शहराध्यक्ष अनिल शिरोळे तर कॉंग्रेसकडून विनायक निम्हण, मोहन जोशी आणि अभय छाजेड यांची नावे चर्चेत आहेत. ‘मनसे’कडून अनिल शिदोरे आणि दीपक पायगुडे इच्छुक आहेत.


कलमाडींचे काय?
काँग्रेसमधील सर्व गटतटांना एकत्र आणून विरोधकांमधल्या दुहीचा फायदा उठवण्याच्या कलेत सुरेश कलमाडी वाक् बगार आहेत. पुणे मतदारसंघात जिंकायचे असेल तर कलमाडी यांना बाजूला ठेवता येणार नाही, असा जोरदार मतप्रवाह कॉँग्रेसमध्ये आहे. दुसरीकडे, कलमाडींना उमेदवारी दिल्यास पक्षाची प्रतिमा डागाळेल, हा कलमाडीविरोधकांचा सूर आहे. ‘कलमाडी यांच्याप्रमाणेच अशोक चव्हाण यांच्यासह देशातील अनेक ‘दागी’ काँग्रेस नेत्यांबाबत काय भूमिका घ्यायची, याचा निर्णय राष्ट्रीय पातळीवरील नेते घेणार आहेत. त्यामुळेच पुण्यातल्या उमेदवाराची घोषणा झालेली नाही’ असे कॉँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकार्‍याने सांगितले.