आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाभोळकरांच्या हत्येतील दोषींना शिक्षा करा, ‘सनातन’वर बंदी घाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी मुंबईतील विविध क्षेत्रांतील तरुणांनी ‘युवा विवेक जागर’ असा फोरम स्थापन करून दादर येथील चैत्यभूमीपर्यंत मोर्चा काढला.


डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर सरकारने एकाच दिवसात जादूटोणाविरोधी विधेयकाचा वटहुकूम काढला. मात्र, या कायद्याची तत्काळ अंमलबजावणी होण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी दबाव निर्माण केला पाहिजे. तसेच डॉ. दाभोलकरांच्या हत्येमागील लोकांना पकडून त्यांना कडक शिक्षा व्हायला हवी, सनातन संस्थेसारख्या धार्मिक द्वेष पसरवणा-या संघटनेवर बंदी हवी आणि जाहिराती, प्रसारमाध्यमांतून होणारा अंधश्रद्धांचा प्रचार तातडीने थांबवायला हवा, अशा तीन प्रमुख मागण्या या वेळी तरुणांनी केल्या.
या मोर्चामध्ये ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे, ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत जे. व्ही. पवार, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक पद्मभूषण देशपांडे, राजकीय संपादक प्रकाश अकोलकर, चित्रलेखा साप्ताहिकाच्या ज्येष्ठ पत्रकार संध्या नरे-पवार आदी मान्यवर तसेच 17 विविध संघटना सामील झाल्या होत्या. कोणत्याही राजकीय संघटनेचा आधार न घेता पहिल्यांदाच अशा पद्धतीने मुंबईतील तरुण रस्त्यावर उतरला होता व यापुढेही समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी कायम तयार राहण्याचा निश्चय त्यांनी या वेळी केला. तसेच अंधश्रद्धांना खतपाणी घालणा-या धागे, दोरे, लिंबू, बाहुल्या अशा काही वस्तू या वेळी कच-याच्या डब्यात टाकून प्रतीकात्मक निषेधही या वेळी नोंदवण्यात आला. एका सामाजिक कार्यकर्त्याची धर्मांधांकडून झालेली हत्या ही खूपच धक्कादायक बाब असून दाभोलकरांचे विचार पुढे घेऊन जायला हवेत, असे दिनू रणदिवे यांनी सांगितले. दाभोलकरांच्या मारेक-यांना अटक होईपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहिले पाहिजे, असे जे. व्ही. पवार यांनी सांगितले.