आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुधाच्या खरेदी दरात 3 रुपयांनी वाढ; रक्कम थेट उत्पादकाच्या बँक खात्यावर होणार जमा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दुधाच्या खरेदी दरात 3 रुपये वाढ करण्यात आली आहे. गायीचे दूध 24 वरून 27 रुपये प्रतिलिटर तर म्हैशीच्या दुधासाठी खरेदी दर 33 वरुन 36 रुपये प्रतिलिटर करण्यात आले असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. शासनाने दूध उत्पादकांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दरात वाढ केली असली, तरी ग्राहकांचे हित लक्षात घेऊन दूध विक्रीदरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
 
जानकर म्हणाले की, दूध उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र संस्था अधिनियमनांतर्गत दूध खरेदी देयकाची रक्कम थेट त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक सहकारी दुग्ध संस्था, तसेच अशी सेवा पुरवू शकणाऱ्या संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, थेट लाभ प्रदानसाठी केंद्र शासनाने नेमलेल्या खाजगी बँका यांच्याशी संपर्क साधून 100 टक्के सभासदांना ऑनलाईन सुविधा असणाऱ्या बँकेत खाती उघडण्याच्या सुचना दिल्या आहेत. ही कार्यवाही दोन महिन्यांच्या आत सुरु करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या प्राथमिक सहकारी दुग्ध संस्था या निर्देशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्याविरुध्द सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांच्यामार्फत कारवाई करण्यात येणार आहे.

दुग्धव्यवसायांतर्गत येणाऱ्या शासकीय, सहकारी आणि खाजगी या संस्थांचे दर समान राहण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, दूध विक्री दराबाबत प्रदत्त समिती नेमण्यात आली आहे. ही समिती वर्षातून एकदा बैठक घेऊन महागाई निर्देशांकानुसार दुध खरेदी विक्री दर निश्चितीसंदर्भात निर्णय घेणार आहे, असेही जानकर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...