आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाड्याच्या समन्यायी पाणीवाटपाच्या मागणीबाबत विचार करून निर्णय घेऊ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठवाड्याच्या समन्यायी पाणीवाटपाच्या मागणीबाबत सारासार विचार करून निर्णय घेऊ. पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीसारख्या पूर्ववाहिनीत वळवून गोदावरी खो-यातील 20 टीएमसी पाण्याची तूट भरून काढू, अशा आश्वासनाने जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी मराठवाड्यातील आमदारांची बोळवण केली.


समन्यायी पाणीवाटपाबाबतचा कायदा अस्तित्वात असूनही मराठवाड्याला स्वत:च्या हक्काचेदेखील पाणी मिळत नसल्याबद्दलची अल्पकालीन चर्चा मराठवाड्यातील आमदारांनी सभागृहात उपस्थित केली होती. प्रशांत बंब, पृथ्वीराज साठे, चंद्रकांत दानवे, प्रदीप नाईक, शंकर धोंडगे, संतोष सांबरे, मीराताई रेंगे पाटील, पंकजा मुंडे-पालवे, डॉ. कल्याण काळे, उत्तमराव ढिकले, ओमराजे निंबाळकर आदी आमदार चर्चेत सहभागी झाले होते.

गोदावरीच्या उपखोºयांमधील आणखी 18 टीएमसी पाणी अडवण्यासाठी 205 प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तसा निर्णय गुरुवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला असून यासंदर्भात राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजनदेखील करण्यात आले आहे. या माध्यमातून गोदावरी खोºयातील पाण्याची तूट भरून काढण्यात येईल व मराठवाड्याला स्वत:च्या हक्काचे 18 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी समन्यायी पाणीवाटपासोबत समन्यायी विकासाची भूमिकादेखील दूरगामी दृष्टीने अंगीकारण्यात येणार असल्याचे तटकरे म्हणाले.


2004मध्ये जायकवाडीच्या उर्ध्व भागांमध्ये नवीन धरणांना मनाई केली असतानादेखील 48 टीएमसी क्षमतेची धरणे बांधली गेली. समन्यायी पाणीवाटपाबाबतच्या कायद्याची जल नियामक प्राधिकरणाकडूनच थट्टा केली जात आहे. मागण्या मान्य न झाल्यास असहकार आंदोलन छेडावे लागेल,अशा शब्दांत बंब यांनी संताप व्यक्त केला. वरच्या भागांतील लोकांकडून पाण्याचा अतिवापर होऊ नये, यासाठी दोन वर्षांमध्ये उर्ध्व भागातील शेतकºयांना ठिबक सिंचनाची सोय उपलब्ध करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.


उस्मानाबाद जिल्ह्यात आजही धरणांचा गाळ काढण्याची कामे सुरू आहेत. यावरून तेथील पाणीटंचाईची स्थिती लक्षात यावी. आम्ही आमच्या हक्काचे 25 टीएमसी पाणी मागतो आहोत. किमान आमच्या पुढच्या पिढीला तरी पाणी मिळू द्या, असा उपरोधिक टोला ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी लगावला.