आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कितीही भांडलो, तरी आम्ही आमच्याचसाठी भांडतो - भास्कर जाधव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘आम्ही कितीही भांडलो, तरी आम्ही आमच्याचसाठी भांडतो. विरोधकांच्या फायद्यासाठी नाही. एका निवडणुकीमुळे आघाडीवर परिणाम होत नाही. पुढील निवडणुकीत आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील, यासाठी आम्ही प्रयत्न करू’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगली महापालिका निवडणुकीदरम्यान संबंध ताणले गेलेल्या काँग्रेसशी मंगळवारी पुन्हा मनोमिलन साधण्याचा प्रयत्न केला.


सांगलीत पराभव जरी पक्षाने मान्य केला असला, तरी निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढल्याचा दावाही त्यांनी केला. ही महापालिका स्थापनेपासून दोनदा काँग्रेसच्या ताब्यात होती. 2008 मध्ये राष्ट्रवादीने जरी विजय मिळवला असला, तरी ही निवडणूक घड्याळाच्या चिन्हावर लढवण्यात आली नव्हती. तसेच, राष्ट्रवादीने त्या वेळी इतरांसोबत आघाडीही केली होती. त्या वेळी आघाडीला 36 जागा मिळाल्या होत्या. तर एकट्या लढलेल्या काँग्रेसला निर्विवादपणे 25 जागा मिळाल्या होत्या. या वेळी सगळे दूर जाऊनही राष्ट्रवादीला सुमारे 31 टक्के मतदान होऊन 18 जागा मिळाल्या, असे जाधव म्हणाले.
भिडू सोडून गेलेल्या अवस्थेत आणि स्वत:च्या चिन्हावर निवडणूक लढवूनही मागच्या वेळच्या तुलनेत राष्ट्रवादीला मिळालेल्या मतांची संख्या वाढली, असा दावा जाधव यांनी केला.


मुस्लिम दुरावले नाहीतच
सांगलीत मुस्लिम समाज पक्षापासून दूर गेल्याचा आरोपही जाधव यांनी फेटाळून लावला. काँग्रेसचे 40 पैकी केवळ 6, तर आपल्या पक्षाचे 18 पैकी 4 नगरसेवक मुस्लिम असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये 5 उमेदवार मागासवर्गीय, 3 भटक्या जमाती, 5 ओबीसी व 3 सर्वसाधारण गटांतील असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस केवळ मराठ्यांचा पक्ष असल्याचा होणारा आरोप खरा नाही, असेही जाधव यांनी सांगितले.