मुंबई- लोकसभा निवडणुकीत आमचा राष्ट्रवादी पक्ष फारच मर्यादित जागा लढवित आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपण पंतप्रधानपद स्वीकारणार नाही म्हणजे नाहीच असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
माध्यमांसह राजकीय, सामाजिक आदी विविध पातळ्यावरून शरद पवारांना पंतप्रधानपदाबाबत विचारणा केली जात आहे. याबाबत स्वत: पवारांनीच
फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. त्यात पवारांनी म्हटले आहे की, मला पंतप्रधानपदाबाबत प्रश्न विचारण्यात येतात. पण माझे उत्तर 'नाही' असेच आहे. लोकसभेसाठी आम्ही फार मर्यादित जागा लढवत आहोत. त्यामुळे आपल्याकडे संख्याबळ पुरेसे नसल्याची जाणीव आहे. आपण गुजराल आणि देवेगौडा यांचे उदाहरण पाहिले आहे. कमी खासदारांच्या जोरावर ते केवळ काही दिवसच पंतप्रधानपदी राहू शकले. याचबरोबर पंतप्रधानपद हे केवळ शोभेचे पद नाही. तेथे तुम्ही परफॉर्म करू शकला पाहिजेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तुम्ही छाप सोडली पाहिजे तरच तेथील लोक व त्यांच्या कम्युनिटी तुम्हाला गांभीर्याने घेतात, असे पवारांनी आपल्या फेसबुक वॉलवर म्हटले आहे.
भारत देश आज वेगळ्या टप्प्यावरून जात आहे. त्यामुळे देशाला मजबूत व स्थिर सरकारची गरज आहे. जेणेकरून हे असे सरकार आर्थिक विकासासाठी खंभीर निर्णय घेऊ शकेल. जगभरातील एकून लोकशाही देशांपैकी 50 टक्केपेक्षा जास्त देशांमध्ये आघाडी व विविध पक्षांचे (कोअलिशन गव्हर्मेंट) सरकारे आहेत. भारतातही तशीच स्थिती आहे त्यामुळे कोअलिशन सरकार चालवणे ही काही अवघड बाब आहे असे मी मानत नाही पण असे सरकार टिकाऊ असले पाहिजे. नेतृत्व करणाऱ्या पक्षाकडे अधिक जागा असणे आवश्यक आहे. यासाठीच इतरांपेक्षा कमाल संख्याबळ हवे आहे. ते आमच्याकडे नसल्याची जाणीव मला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपण पंतप्रधानपदाचा विचार करीत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अशी संधी निर्माण झाली तरी आपण ते स्वीकारणार नाही म्हणजे नाहीच अशी भूमिका पवार यांनी फेसबुकवर मांडली आहे.