आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Quraal Among The Member Of Legislative Assembly At Vidhanbhavan

विधानभवन परिसरात आमदारांमध्ये हमरीतुमरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत हमरी-तुमरीवर येणा-या आमदारांत मंगळवारी विधानभवनाच्या आवारातही भांडण झाले. शेकापचे आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप बजोरिया यांच्यामध्ये सिंचनाच्या विषयावरून शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र विधिमंडळ कर्मचारी व काही आमदारांनी हे भांडण सोडवले.

गेल्या अधिवेशनामध्येच जयंत पाटील यांनी सिंचन गैरव्यवहारावर एसआयटीची मागणी केली होती. त्या वेळी बजोरिया यांनी भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. त्याचे पडसाद आज पुन्हा उमटले. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी प्रश्न देण्यासाठी आमदारांना मंगळवारचा दिवस देण्यात आला होता. त्यासाठी आमदार विधानभवनात आले होते. तेव्हा जयंत पाटील आणि बजोरिया समोरासमोर आले. पाटील यांच्याबरोबर गोपीकिसन बजोरिया हे दुसरे आमदार काही बोलत होते. त्यावेळी संदीप बजोरिया यांनी पाटील यांना उद्देशून वक्तव्य केले. त्यामुळे पाटील भडकले आणि त्यांनीही प्रत्त्युत्तर देण्यास सुरुवात केली. मग ‘तुला बघून घेईन’, ‘काय करशील’, ‘बघतोच तुला’ अशी वक्तव्ये, शिवीगाळ दोन्ही बाजूंनी झाली. मात्र, आमदार किसन बजोरिया, दिवाकर रावते यांनी त्यांचे भांडण सोडविले.

पाटलांकडूनच शिवीगाळ
बजोरिया म्हणाले की, आपण जयंत पाटील यांना काहीच बोलत नव्हतो की त्यांचे नावही घेतले नव्हते. त्यांनी माझ्याशी भांडायचे कारणच नव्हते. कोणत्याही कारणाशिवाय ते शिवीगाळ करायला लागल्यावर मी गप्प कसा बसणार?
बजोरियांकडून सुरूवात
जयंत पाटील म्हणाले की, भांडणाची सुरुवात बजोरियांकडून झाली. सुरुवातीला मी ऐकून घेतले; पण त्यांनी मर्यादा ओलांडल्यावर आपणही काही सुनावले. आपण सिंचनाचे घोटाळे बाहेर काढल्यापासून ते नाराज आहेत.