आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • R.R.Patil News In Marathi, Home Minister, Court, Divya Marathi

चक्क गृहमंत्री आर.आर. पाटीलच न्यायालयात ‘हजर’ होतात तेव्हा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - न्यायालयाने गृहमंत्रालय वा गृहमंत्री यांना फटकारणे नवे नाही. एखाद्या प्रकरणी आरोपी ठरल्यानंतर राजकीय नेत्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देत आरोपीच्या पिंजर्‍यता उभे राहावे लागणेही नवे नाही. मात्र वरीलपैकी काहीही घडले नसतानाही गृहमंत्री आर. आर. पाटील हे स्वत: गुरुवारी न्यायालयात हजर झाले तेव्हा माध्यमांना, पोलिसांना आणि न्यायव्यवस्थेलाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला !


शक्ती मिल अत्याचार प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होण्यापूर्वी अकराच्या सुमारास पाटील हे सत्र न्यायालयात आले. त्यानंतर थेट न्यायाधीशांसमोर असलेल्या वकिलांच्या रांगेच्या पाठीमागे असलेल्या सर्वसामान्य जनतेसाठीच्या बैठक व्यवस्थेच्या पहिल्या रांगेत ते स्थानापन्न झाले. त्यांच्या शेजारी पोलिस उपायुक्त सत्यनारायण चौधरी हे बसले होते. साधारण पाऊण तास चाललेल्या या संपूर्ण कामकाजादरम्यान आबांनी लक्षपूर्वक तिथे घडणारी प्रत्येक गोष्ट पाहिली. कामकाज सुरू होण्यापूर्वी ते काही पोलिस अधिकार्‍यांशी जुजबी बोलले. गेल्या काही वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा गृहमंत्री स्वत: एखाद्या सुनावणीला हजर राहण्याचा बहुदा हा पहिलाच प्रसंग असावा. त्यांच्या उपस्थितीने हे प्रकरण राज्य सरकारने गांभीर्याने घेतले होते, असा संदेश देण्याचाही त्यांचा हेतू होता.
न्यायालयाच्या या निकालामुळे पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाल्याची भावना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केली. मुंबई पोलिसांनी 27 दिवसांच्या आत तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केल्यामुळे तसेच न्यायालयानेही दररोज सुनावणी घेतल्याने अत्यंत कमी वेळात न्याय मिळण्यास मदत झाली असेही पाटील म्हणाले.


जलदगती न्यायालयांची संख्या वाढवणार
महिलांच्या इतर प्रकरणांमध्येही लवकर न्याय मिळावा यासाठी जलदगती न्यायालयांच्या संख्या वाढवण्याचा सरकार प्रयत्न करत असून मुंबईला महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित शहर बनवण्यासाठी एनजीओ आणि जनतेकडून सूचना मागवण्यात आल्याचेही गृहमंत्री पाटील म्हणाले.