आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • R R Patil Comment On Karanataka Assembly Election

सीमावासीयांनी कर्नाटक निवडणुकीत एकी दाखवावी, गृहमंत्र्यांचे आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कर्नाटक सरकारचे सीमावासीयांवरील अत्याचार थांबविण्यासाठी मराठी आमदार निवडून येणे गरजेचे आहे. त्यासाठी आगामी निवडणुकीत सीमावासीयांनी एकजूट करत महाराष्‍ट्र एकीकरण समितीचे दोन-तीन आमदार निवडून द्यावेत, असे आवाहन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी विधानपरिषदेत केले.


दिवाकर रावते यांनी आर. आर. पाटील यांनी बेळगावात केलेल्या भाषणाबद्दल अभिनंदन केले. त्यावर पाटील म्हणाले, सीमावासीयांची लढाई कन्नड भाषकांशी नाही तर कर्नाटक शासनाशी आहे. सीमाभागातील मराठी माणसांत फूट पडली आहे. त्यामुळे ‘मराठी एकीकरण’चा एकही आमदार निवडून येत नाही. कर्नाटकचे शासन कायम अस्थिर असते. म्हणून चार-दोन मराठी आमदार निवडून आल्यास शासनावर वचक ठेवणे सोपे जाईल. सीमाप्रश्नी निकाल कधीही लागो, तोपर्यंत निवडणुकांकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.

सीमा भागात जाणारच
किरण ठाकूर यांच्या एकसष्टीनिमित्त केलेले भाषण निवडणूक आयोगाने शब्दश: घ्यायला नको होते. मात्र यापुढेही आपण सीमाभागात जाणार आणि भाषणही करणार. मात्र शब्दांचा वापर जपून करू, असे आर. आर. म्हणाले. उपसभापती वसंत डावखरे, शेकापचे जयंत पाटील, सुरेश नवले यांनी आबांच्या पाठीशी महाराष्‍ट्र असल्याचे सांगितले, तर पाटील यांच्याबरोबर सीमाभागात सभांना जाण्याची तयारी दिवाकर रावते आणि रामदास कदम या शिवसेनेच्या नेत्यांनी दर्शवली.