आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • R R Patil\'s Doughter Smita Meet Anna Hazare Over Dance Bar Ban Lifted Issue

सरकारला घुंगरू घालून नाचवणार- डान्सबार बंदीविरोधात आबांच्या कन्येचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मिता पाटील यांनी आर. आर. पाटील फाऊंडेशनच्या वतीने राळेगणमध्ये जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट घेतली. यावेळी स्मिता यांनी डान्सबार बंदीसंदर्भात अण्णांशी चर्चा केली. - Divya Marathi
स्मिता पाटील यांनी आर. आर. पाटील फाऊंडेशनच्या वतीने राळेगणमध्ये जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट घेतली. यावेळी स्मिता यांनी डान्सबार बंदीसंदर्भात अण्णांशी चर्चा केली.
अहमदनगर- माजी गृहमंत्री आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी डान्सबार विरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आम्ही प्रथम सरकारशी चर्चा करू, या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला तर ठीक नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू व घुंगरू घालून राज्य सरकारला नाचवू असा निर्वाणीचा इशारा स्मिता पाटील यांनी दिला आहे.
आर आर पाटील फाऊंडेशनच्या वतीने स्मिता पाटील हिने राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेव अण्णा हजारे यांची रविवारी भेट घेतली. या बैठकीला स्मिता पाटील हिच्यासह आर आर पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांच्यासोबत अभिजित देशमुख, पुंडलिक जंगले व इतर सदस्य उपस्थित होते.
आर आर आबांनी डान्स बार बंदीचा घेतलेला निर्णय कसा योग्य होता. सरकारने बार पुन्हा सुरु केले तर तरूण पिढी वाया जाईल याची माहिती स्मिताने अण्णांना दिली. आपण ज्येष्ठ व आदरणीय आहात. सरकारला आपल्या वतीने दोन शब्द सबुरीचे सांगितले तर सरकार ऐकेल यासाठी मी तुमच्याकडे आली आहे. सरकार डान्स बार सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. कोर्टात आपली बाजू भक्कम मांडण्यासाठी राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे आदी मुद्यांवर स्मिताने अण्णांशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी अण्णांनी डान्स बारविरोधात आपण लक्ष घालू व सरकारला डान्स बार सुरु करण्याचा निर्णय माघारी घेण्यास भाग पाडू असे आश्वासन स्मिताला दिले. यानंतर माध्यमांशी बोलताना स्मिता म्हणाली, राज्यात डान्स बार बंद राहावेत यासाठी मी आर आर पाटील फाऊंडेशनच्या वतीने मोहिम हाती घेतली आहे. आबांनी ऐतिहासिक निर्णय घेताना जनहित पाहिले होते. अनेक तरूणांचे आयुष्य डान्स बारमुळे बरबाद झाल्याचे आबांनी पाहिल्यामुळेच त्यांनी डान्सबारवर बंदी आणली. आता सरकार पुन्हा डान्स बार सुरु पाहत आहे. आबांचे निधन होऊन सहा महिने होत नाहीत तोवर सरकारला ही सुबुद्धी सुचली आहे. आबांची कन्या म्हणून मला हे न रूचणारे आहे. त्यामुळे आर आर पाटील फाऊंडेशनच्या वतीने या विरोधात मी आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारला आम्ही निवेदन दिली आहेत. त्याची अद्याप दखल घेतली नाही. लवकरच आम्ही संबंधित लोकांची भेट चर्चा करणार आहोत. सरकारने आमचे ऐकले तर ठीक नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. सरकारला घुंगरू घालून नाचवणार व सामान्यांत जनजागृती करणार असा निर्वाणीचा इशारा स्मिता पाटील हिने दिला.