आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Radhakrushna Vikhe patil Cancel His Us Tour With Cm

अशोक चव्हाणांनी दणका देताच विखे-पाटलांचा अमेरिका दौराच रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- येत्या पावसाळी अधिवेशनात फडणवीस सरकारच्या विरोधात आक्रमक होण्यासाठी व त्या कामकाजावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी 15 ज्येष्ठ आमदारांची नियुक्ती करून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना दणका दिला आहे. भाजपशी खासकरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विखेंची वाढती जवळीक पाहता अशोक चव्हाणांनी हा दणका दिल्याचे मानले जात आहे. याद्वारे अशोक चव्हाणांनी विखे-पाटलांचे पंख छाटल्याची चर्चा होताच त्यांनी आपला अमेरिका दौरा रद्द केला आहे. विखे-पाटील मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार होते.
काँग्रेसने भाजपच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली असताना विरोधी पक्ष नेत्याने मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे व ते ही शासकीय खर्चाने यातून योग्य संदेश जाणार नाही, अशी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली होती. मी मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेत्याला कधीही दौ-यावर नेले नाही असे सांगत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी विखे-पाटलांच्या उपस्थितीतच त्यांना टोला हाणला होता. त्यामुळे विखेंनी अखेर अमेरिका दौराच रद्द केला आहे.
गेल्या वर्षी भाजप सरकार स्थापन झाले (शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय) तेव्हा राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमधील 15 आमदारांचा गट घेऊन भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे काँग्रेस अस्वस्थ होती. पक्षाचा दारूण पराभव झाला असतानाही 15 आमदारांचा गट फुटून जाऊ नये म्हणून काँग्रेस पक्षाने राधाकृष्ण विखे-पाटलांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद दिल्याचे सांगितले जाते. अन्यथा या जागेवर पृथ्वीराज चव्हाणांची नेमणूक केली जाणार होती. विखे-पाटील अशोक चव्हाण गटाचे मानले जातात. मात्र, त्यांची भाजपशी जवळीक वाढल्याने चव्हाणांनी त्यांचे पंख छाटण्यास सुरुवात केल्याचे समजते आहे.
असे छाटले पंख-

देशात व नंतर राज्यातही झालेल्या दारूण पराभवानंतर खचलेल्या काँग्रेस पक्षाने भाजपमधील अस्वस्थतेच्या संधीचा लाभ उठविण्यासाठी एक रणनिती आखली आहे. त्याचाच भाग म्हणून प्रदेश काँग्रेस संसदीय मंडळाची दोन दिवसापूर्वी विधानभवनात महत्त्वाची बैठक झाली. यात, युती सरकारच्या विरोधत आक्रमक होण्याची रणनीती आखण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 15 आमदारांची समितीही या वेळी स्थापन करण्यात आली. आगामी पावसाळी अधिवेशनात उपस्थित करावयाचे विषय, त्या विषयावर बोलणारे आमदार यांचा समन्वय साधण्याची जबाबदारी या समितीवर दिली आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक विभागाच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी कॉंग्रेसने पक्षांतर्गत 'शॅडो कॅबिनेट' स्थापन करण्याचा निर्णयदेखील या बैठकीत घेतला. काँग्रेसच्या ज्या आमदाराचा एखाद्या विषयात अभ्यास असेल, तर त्या आमदाराने सरकारच्या संबधित विभागावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
याद्वारे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी विखे-पाटलांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची खेळी केली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांना भाजपाविरोधात आक्रमक होण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. याचे संकेतही विखेंनी दिले आहेत. पंकजा मुंडे व विनोद तावडेंनी राजीनामा दिल्याशिवाय पावसाळी अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही अशी भीमगर्जना विखेंनी त्यामुळेच केली आहे.