आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Radhakrushna Vikhe patil May New Congress State President

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विखे-पाटील?, 3 दिवसापासून दिल्लीत खलबते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चार राज्यात दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेस केंद्रीय व राज्य स्तरावर संघटनात्मक पातळीवर फेरबदल करणार असून महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटणार आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गेली तीन दिवस दिल्लीत खलबते करीत आहेत. राज्यातील काँग्रेसच्या वाट्यातील विविध महामंडळांच्या अध्यक्षांची नियुक्ती करणे, निष्कीर्य मंत्री वगळून नव्या चेह-यांना संधी देणे व प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा आणणे आदी फेरबदल होण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.
कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपदी नाव जवळपास निश्चित झाले असून, माणिकराव ठाकरेंना यवतमाळमधून लोकसभा लढविण्याचे आदेश मिळणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. उद्योगमंत्री नारायण राणे यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याची तयारी सुरु होती मात्र आपल्याला प्रदेशाध्यक्षपद दिले तरी मंत्रीपदी कायम ठेवावे लागेल ही अट पक्षश्रेष्ठींना मान्य नसल्याचे राणेंच्या नावावर फुली मारण्यात आली असल्याचे कळते.
राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावावर सहमती होत असल्याचे कळते. यात त्यांच्या जमेच्या बाजू लक्षात घेतल्या जात आहेत. काँग्रेसला मराठवाड्यात व विदर्भात चांगले यश मिळविण्याची खात्री आहे. त्यामुळेच त्या भागाला जोडणा-या नेत्यांची नाळ असावी असे त्या तेथील काँग्रेस पदाधिका-यांना वाटत आहे. त्यामुळे विखे-पाटील यांच्या नावावर एकमत होत असल्याचे चित्र आहे.
आक्रमक चेहरा असलेल्या नारायण राणेंचाही गांभीर्याने विचार केला जात होता. मात्र आपल्या प्रदेशाध्यक्षपद देण्याबरोबरच मंत्रिपद कायम ठेवावे अशी अट ठेवली गेली. मात्र एक नेता एक पद या फॉर्म्युल्यानुसार राणेंचा विचार होऊ शकत नाही. तसेच ते आपल्या भूमिकेवरून हालण्याची सूतराम शक्यता नाही. या सर्व बाबी गृहित धरून विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील नावांचा विचार सुरु ठेवला आहे. मात्र हर्षवर्धन पाटील पश्चिम महाराष्ट्रात मोडत असल्याने त्यांच्या नावावर एकमत होत नाही. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षपद पश्चिम महाराष्ट्राकडे गेल्यास वेगळा संदेश जाईल त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार सोडून देण्यात आला. त्यातच नगर जिल्ह्यातील विखे-पाटील यांना विदर्भातील व मराठवाड्यातील आमदारांची पसंती मिळत आहे. विखे-पाटील यांची राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक म्हणून ओळख आहे. त्यामुळे ते राणेंसारखे आक्रमक नसले तरी राष्ट्रवादीला शह देऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.