आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधेमाँचा अटकपूर्व जामीन फेटाळला, आज हजर न राहिल्यास अटकेची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्वयंघोषित गुरू राधेमाँ हिचा अटकपूर्व जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. शुक्रवारी पोलिसांनी तिला कांदिवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले अाहेत. मात्र, ती गैरहजर राहिल्यास राधेमाँ हिला अटक होऊ शकते.
आपल्यावरचे सर्व आरोप निराधार असल्याचा दावा करत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणाऱ्या राधेमाँ हिचा जामिन कोर्टाने फेटाळला आहे. राधेमाँ हिने पोलिस ठाण्यातील हजेरी टाळण्यासाठी हा जामीन अर्ज केल्याचा मुद्दा निकी गुप्ता हिच्या वकिलांनी मांडला. तसेच राधेमाँ हिला अटकपूर्व जामीन मिळाल्यास ती परदेशात पळून जाण्याचा धोका असल्याकडेही लक्ष वेधले. त्याच बरोबर या प्रकरणी फिर्यादी तसेच इतर पाच आरोपींचे जबाब नाेंदवण्यात आले असून राधेमाँ हिच्या चौकशीची गरज असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. यासाठी तिला शुक्रवारी बोलावण्यात आले असून ही चौकशी २५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याची विनंती राधेमाँने केल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. या सर्व बाबी ग्राह्य धरून न्यायालयाने राधेमाँ हिचा जामीन अर्ज फेटाळला.

दोन आठवड्यांपूर्वी कांदिवली परिसरातील निक्की गुप्ता या महिलेने सासरच्या सहा जणांविराेधात हुंड्यासाठी छळाची तक्रार केली आहे. राधेमाँ हिच्या सांगण्यावरूनच सासरचे लाेक आपला मानसिक छळ करत असल्याचा निक्की यांचा आरोप आहे. निक्की यांच्या तक्रारीवरून राधेमाँसह सातही जणांवर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.
त्यातील पाच आरोपींचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला असून राधे माँ हिला सोमवारी पोलिसांनी समन्स बजावले आहे. त्यानुसार राधे माँला शुक्रवारी कांदिवली पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, राधे माँने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

डॉली बिंद्राने मागितली सुरक्षा
राधेमाँ हिच्याबाबत वृत्तवाहिन्यांवर प्रतिक्रिया दिल्याने आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या येत असून आपल्याला तसेच आपल्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याची विनंती डॉली बिंद्रा या अभिनेत्रीने केली आहे. या संदर्भातील एक पत्र तिने मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना लिहिले आहे.