आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशवाणी, दूरदर्शनवर लोककलावंत दुर्लक्षितच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गायसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, सुधीर फडके, श्रीनिवास खळे यासह इतर नामवंत कलाकारांच्या वाढदिवशी त्यांची गाणी दिवसभर आकाशवाणी, एफएम रेडिओवर वाजवली जातात. मात्र, प्रस्थापितांच्या कलेसमोर लोककलेला नेहमीच दुय्यम दर्जा दिला जातो. याचे ताजे उदाहरण म्हणजे 3 सप्टेंबर रोजी शाहीर साबळे यांचा वाढदिवस झाला. मात्र, आकाशवाणी व दूरदर्शन या दोन शासकीय वाहिन्यांनी त्याची दखल घेण्याचेही कष्ट घेतले नाहीत.
ज्या शाहीर साबळेंच्या आवाजातील ‘जय जय महाराष्ट्र’ या गीताशिवाय कोणताही कार्यक्रम पूर्ण होत नाही, त्यांची साधी आठवणही शासकीय वाहिन्यांनी काढली नाही. अनुल्लेखाने मारले जाणारे ते एकमेव लोककलाकार नव्हेत. शाहीर विठ्ठल उमप यांनी ‘फू बाई फू’, ‘माझी मैना गावाकडं राहिली’ यासारखी 1000 लोकगीते प्रसिद्ध केली. त्याचप्रमाणे ‘काठी न् घोंगडं’ हे लोकप्रिय गाणे लिहिणारे आणि गाणारे शाहीर निवृत्ती पवार हेही शासकीय वाहिन्यांच्या यादीतून हद्दपार आहेत.
शाहीर उमप, वामनदादा कर्डक, शाहीर निवृत्ती पवार या शाहिरांनी मुंबई दूरदर्शन व आकाशवाणीसाठी अनेक कार्यक्रम रेकॉर्ड केले. मात्र, 30 जून या शाहीर पवार यांच्या जन्मदिनी तसेच 15 जुलै या शाहीर उमप यांच्या जन्मदिनी त्यांची गाणी आकाशवाणीवरून प्रसारित केली नाहीत.
‘महाराष्ट्राची लोकधारा’ सारखा कार्यक्रम करणारे शाहीर साबळे, 1000 पेक्षा जास्त लोकगीते नावावर असलेले ‘जांभूळ आख्यान’चे सर्वेसर्वा शाहीर विठ्ठल उमप, खडतर परिस्थितीतून मार्ग काढत गायनाचा छंद जपत अनेक लोकगीते प्रसिद्ध करणारे शाहीर निवृत्ती पवार यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे. या गायकांनी दूरदर्शनसाठीही काही कार्यक्रम केले होते. त्यांच्या जुन्या टेप्स दूरदर्शनकडे आहेत. मात्र, या लोककलावंतांची आठवण काढून त्यांची गाणी व माहिती प्रसारित करण्याचे कष्ट घेताना दिसत नाहीत, अशी खंत या कलावंतांच्या पुढच्या पिढीला वाटते.
डॉक्युमेंटेशन नाही
एका विशिष्ट समाजाचा पगडा कलेच्या विश्वावरही दिसतो. त्याचा परिणाम म्हणजे जो माणूस शेवटच्या श्वासापर्यंत आकाशवाणीशी नातं ठेवून होता, त्या विठ्ठल उपम यांच्यासारख्या लोककलावंताची साधी दखलही रेडिओवर घेतली जाऊ नये? 1000 पेक्षा जास्त लोककला नावावर असलेल्या शाहीर विठ्ठल उमपांवर शासनातर्फे एखादी डॉक्युमेंटरी करावी, असेही त्यांना सुचले नाही की त्यांच्या गीतांचे डॉक्युमेंटेशन झाले नाही.
नंदेश विठ्ठल उमप
ठेवा जतन होईल काय?
आकाशवाणीमुळे शाहीर साबळे महाराष्ट्राच्या घराघरांत ओळखले गेले. मात्र, त्याच आकाशवाणीवर किंवा दूरदर्शनवर शाहीर साबळेंच्या आठवणीनिमित्ताने एखादा कार्यक्रम झालेला माझ्या तरी स्मृतीत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वसंतराव देशपांडे यांच्या ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकाची जुनी टेप दूरदर्शनकडे होती. मात्र, कोणाच्या तरी हलगर्जीमुळे त्याच टेपवर दुसरे काही तरी रिरेकॉर्ड करण्यात आले. जेव्हा दस्तुरखुद्द वसंतराव देशपांडे यांचा दस्तऐवज असा खराब करण्यात येऊ शकतो, तिथे शाहीर साबळेंच्या जुन्या टेप्स जतन केल्या जातील, यावर विश्वास कसा ठेवायचा?
केदार शिंदे, प्रसिद्ध दिग्दर्शक