मुंबई - पेट्रोल स्वस्त होत असताना डाळ मात्र का स्वस्त होत नाही, असा प्रश्न विचारत काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. धारावी झोपडपट्टीत लोकांशी संवाद साधताना भारताला "मेक इन इंडिया'ची नव्हे, तर "मेक इन धारावी'ची गरज असल्याचे ते म्हणाले.
"मोदी सरकार सध्या निवडक दोन- तीन उद्योगपतींसाठी काम करत आहे. मेक इन इंडिया अशा बड्या कंपन्यांसाठीच आहे. धारावीतील छोट्या- छोट्या उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, अशा मेक इन धारावीची गरज आहे,' अशी टीका राहुल गांधी यांनी केली. पदयात्रेनंतर धारावीत जमलेल्या सुमारे २ लाखांच्या समुदायास राहुल गांधी यांनी संबोधित केले. तत्पूर्वी ते किमान २ तास संपूर्ण धारावीचा परिसर पायी फिरले. "पेट्रोल स्वस्त होत असताना डाळीचे भाव मात्र २३० रुपये किलोच्या खाली का उतरत नाहीत, याचे उत्तर पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावे. १५ लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार होते, ते कुठे गेले? धारावीत राहणाऱ्या युवकांना रोजगार कधी मिळेल? काँग्रेस पक्ष हा शेतकरी, शेतमजूर, दुर्बल घटक आणि धारावीतील लिटल इंडियाचा पक्ष आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास केवळ निवडक उद्योगपतींसाठी काम करणार नाही. सर्वसमावेशक भूमिका व पारदर्शक धोरणे ही कामाची शैली असेल,' असे गांधी म्हणाले.
अतिथीगृहासाठी नेत्यांची धावपळ
दरम्यान, शुक्रवारी रात्री राहुल गांधी यांच्या निवासाची व्यवस्था राज्य अतिथीगृह असलेल्या मलबार हिलवरील सह्याद्री अतिथीगृहात व्हावी, असा प्रयत्न काँग्रेसतर्फे करण्यात आला. परंतु राज्य सरकारकडून नकार मिळाला. नंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासाठी स्वत: प्रयत्न केल्याने गांधी यांना केवळ एक कक्ष देण्यास सरकार तयार झाले. मात्र, त्यांचे अंगरक्षक कुठे राहणार? असा प्रश्न आला. त्यांच्यासाठी वरळीतील एनसीएन क्रीडा संकुलात व्यवस्था करण्यात आली. मात्र, तेथील मैदानावर फिल्मफेअर पुरस्कार सोहळा सुरू असल्याने व तेथे हजारो लोक उपस्थित असल्याने त्यांची व्यवस्था मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए)च्या बांद्रा कुर्ला संकुलातील अतिथीगृहात करण्यात आली.
सरकार उद्योगपतींचेच, ते शेतकऱ्यांच्या कामाचे नाही
विशेष प्रतिनिधी | मुंबई
देशातील कृषी क्षेत्राची स्थिती फारशी चांगली नसून शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून त्यांना भरीव मदत होताना दिसत नाही. भाजप सरकार काही उद्योगपतींसाठीच काम करताना दिसत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात त्यांना रस दिसत नसल्याने बळीराजा उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. त्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत वाढ झाली असून ही काळजीची बाब आहे, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. विलेपार्ले येथील नरसी मोनजी काॅलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर राहुल यांनी शनिवारी सकाळी तासभर देशातील विविध प्रश्नांवर संवाद साधला.
समानता मान्य नाही
सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएससएस) प्रभाव असून संघाने आखून दिलेल्या दिशेने हे सरकार काम करत असल्याचे दिसते. मात्र, आरएसएसची विचारप्रणाली या देशाच्या धर्मनिरपक्षेतेला छेद देणारी आहे. ते हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन असा भेदभाव करताना दिसतात.पुरूष व स्त्री समताही त्यांना मान्य नाही. सध्या देशातील असहिष्णुतेचे वातावरण लोकशाहीसाठी पोषक नाही, असे मत राहुल यांनी मांडले. आपण सारे भारतीय आहोत, हेच काँग्रेसचे सूत्र आहे. त्याच विचारधारेवर आमचा पक्ष काम करतो, असे ते म्हणाले. संवाद संपल्यानंतर त्यांनी विद्यार्थी, प्राध्यापकांबरोबर फोटोही काढले. त्यांच्या पुढील कारकीर्दींची आस्थेने विचारपूस केली.
अनुकरण नको
देशात आयआयटीसारख्या शिक्षण संस्था स्थापण्याची गरज आहे. मात्र, अशा संस्था स्थापन करताना आयआयटीचे अनुकरण करता कामा नये. शिक्षण संस्था उभारताना येणारे अडथळे तत्काळ दूर करण्याची गरज आहे. त्यामुळे शिक्षणाचा प्रचार, प्रसार प्रभावीपणे होईल, असे राहुल म्हणाले.
विद्यार्थ्यांबरोबर रमले
राखाडी रंगाचा टी शर्ट, जिन्स पँट व स्पोर्टस शूज घालून आलेल्या राहुल यांनी सुमारे ३५० विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. अजय सिंग, निखिल असराणी, बिपांशू जेसवानी, नितीन जैन, प्रेरणा अडवाणी, तनुप्रिया अग्रवाल, रोहित रतन यांनी त्यांना प्रश्न विचारले.
पुढील स्लाइडवर वाचा, राहुल गांधींना प्रश्न विचारण्यासाठी रंगीत तालीम