मुंबई -‘काँग्रेस हा अत्यंत गुंतागुंतीचा पक्ष आहे. या पक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखे मारून घाबरवून कुणाला शांत केले जात नाही. त्यामुळे येथे कधी कधी भांडणे होतात. मात्र, पक्षातील भांडणाऱ्यांना शिस्त लावली जाईल’, अशा शब्दांत काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी एकीकडे मुंबई काँग्रेसमधील लाथाळ्यांवर तीव्र नापसंती व्यक्त करतानाच संघ परिवारावरही निशाणा साधला.
मुंबई काँग्रेसच्या राजीव गांधी भवन येथील मुख्यालयातील सभागृहाचे मुरली देवरा सभागृह असे नामकरण करण्यात अाले. या वेळी गांधी यांनी मुरली देवरा यांचे हसऱ्या स्वभावाचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. या सोहळ्यास मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांची उपस्थिती होती.
‘काँग्रेस ही फारच काॅम्प्लिकेटेड पार्टी अाहे. २००४ पासून मी प्रदेश काँग्रेसच्या कामावर लक्ष ठेवून अाहे. अचानक कुठून तरी विराेध हाेताे, मात्र ताे काेण करतेय याचा पत्ताच लागत नाही. या पक्षाचे नेते एकमेकांविराेधात लढतात, रागावतातही. काँग्रेस पक्षात ही नाॅर्मल गाेष्ट अाहे. कारण हा पक्ष काही अारएसएस नाही. संघात तर घाबरवून, धमकावून, मारून- मुटकून गप्प केले जाते. या सर्वांमध्ये प्रेम वाढवणे, शिस्त अाणणे हे माझे काम अाहे. अाता राग विसरून एकमेकांसाेबत चालायला हवे,’ अशा शब्दांत राहुल गांधी गटबाजी करणाऱ्या नेत्यांना चिमटे काढले.
निरुपम यांना ‘जीवदान’
‘काँग्रेस दर्शन’ मासिकातील वादग्रस्त लेखाने अडचणीत अालेले या मािसकाचे संपादक व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची ‘नियत साफ अाहे’, असे सांगत राहुल यांनी त्यांची स्तुती केली. त्यामुळे निरुपम यांच्या अध्यक्षपदाला अाता धाेका नसल्याचे संकेत मिळाले.
देवरा यांचा अादर्श घ्या
‘वेगात जायचे असेल तर एकटेच चाला, मात्र लांब प्रवास करायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊन चला. मुरली देवरा या पद्धतीनेच वागले. एखाद्या व्यक्तीत काही तरी खासियत असल्याशिवाय २२ वर्षे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद टिकवून ठेवू शकत नाही. देवरा जसे राग गिळून काम करायचे तसे काम करा,' असे आवाहनही राहुल यांनी केले.
राज्यात डीएनए काँग्रेसचा
‘काँग्रेस पक्षाचा विचार देशात सर्वाधिक रुजला आणि स्वीकारला गेला असेल तर तो महाराष्ट्रात... महात्मा गांधींनीही हीच भावना व्यक्त केली होती. महाराष्ट्र राज्याच्या ‘डीएनए’तच (जनुकात) काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे अाता मुंबई महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आणण्याचे ध्येय ठेवा’, असे आवाहनही राहुल यांनी स्वपक्षीय नेत्यांना केले.