धुळे- जे लोक आक्रमक बोलतात त्यांच्यात आत्मविश्वास असतोच असे नाही, असे सांगत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच सतत 'मैं मैं' म्हणण्यापेक्षा 'हम' ही संकल्पना घेऊन पुढे गेलो तर देशाचा विकास नक्की होऊ शकतो, असेही राहुल यांनी सांगितले.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे आदिवासी भागातील अभियांत्रिकी आणि पदवीच्या विद्यार्थ्यांशी राहुल यांनी आज दुपारी 12 च्या सुमारास संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात युवकांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब उमटावे म्हणून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी येथे आलो आहे. देशातील युवकांच्या खासकरून ग्रामीण भागातील गरिब, आदिवासी युवकांना काँग्रेस पक्षाकडून काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेण्यासाठी येथे आल्याचे सांगत भावनिक साद घातली.
राहुल म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन गेलो तर अशक्य असे काहीच नाही. मात्र सतत मी केले मी केले असे ओरडून सांगण्याची गरज नसते. आक्रमकपणे बोलणा-या प्रत्येक व्यक्तीत आत्मविश्वास असतोच असे नाही. यावेळी राहुल यांनी आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना काय काय समस्या भेडसवतात याबाबत चर्चा केली. यावेळी नंदुरबारचे खासदार माणिकराव गावित, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव गावित यांच्यासह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक नेते उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर राहुल यांनी शिरपूर ते धुळे या दरम्यान रोड शो केला. यानंतर ते औरंगाबादकडे रवाना झाले आहेत.
राहुल गांधी आज धुळ्यानंतर औरंगाबाद येथे मराठवाडा विभागीय काँग्रेसशी संवाद साधतील. औरंगाबाद येथे त्यांची जाहीर होणार आहे. त्यानंतर ते उद्या मुंबईचा दौरा करणार आहेत. मुंबईत वर्सोवा बीच येथे ते कोळी समाजातील लोकांशी संवाद साधतील. याचबरोबर भिवंडी, कोकण भागातील लोकांशी संवाद साधून जाहीर सभा घेतील.