Home »Maharashtra »Mumbai» Rahul Gandhi Mubai Tour

राहूल गांधींकडे मुख्यमंत्र्यांच्या तक्रारींचा पाढा

प्रतिनिधी | Apr 28, 2012, 03:11 AM IST

  • राहूल गांधींकडे मुख्यमंत्र्यांच्या तक्रारींचा पाढा

मुंबई - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल काँग्रेस नेत्यांमध्येच असलेली प्रचंड नाराजी आणि पक्षांतर्गत तणाव या दोन मुद्यांवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पक्षाचे सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांच्यासमोर गार्‍हाणी मांडून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली. राहुल गांधी यांनी दिवसभर मुंबईमध्ये ब्लॉक अध्यक्षांपासून आमदार, खासदार, मंत्री, स्थानिक स्वराज्य संस्थांचे नवनिर्वाचित सदस्य, यूथ काँग्रेसचे कार्यकर्ते आदींच्या बैठका घेतल्या आणि संवाद साधला.

माटुंगा येथे झालेल्या बैठकीमध्ये नवनिर्वाचित सदस्य, आमदार आणि खासदार उपस्थित होते. येथे काही आमदारांनी मुख्यमंत्री कार्यकर्त्यांची कामे करत नसल्याच्या तक्रारी केल्या. अनेकदा काँग्रेसच्या आमदारांना, कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री भेटत देत नाहीत, असेही राहुल गांधींसमोर उघड व्यक्त करण्यात आले. तसेच मंत्री आणि कार्यकर्ते यांच्यामध्येही कोणताच समन्वय नाही. त्यांनाही भेटणे कठीण असल्याचे राहुल यांना सांगण्यात आले. आमदार आणि खासदारही अनेकदा भेटत नाहीत, अशीही तक्रार नसीम खान यांच्या मतदारसंघातील एका ब्लॉक अध्यक्षाने केली.

कोण काम करत नाही? - राज्यामध्ये 10-12 जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्ष कमकुवत होत असल्याचे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसून आल्याचे काही जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी सांगितले. काँग्रेसच्या टिळक भवन येथील कार्यालयामध्ये ब्लॉक आणि जिल्हा अध्यक्षांच्या झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थितांना विचारले. त्यावर आपण जर सत्य सांगितले तर आपले अध्यक्षपद राहणार नाही, अशी भीती कल्याण येथील एका महिला ब्लॉक अध्यक्षाने व्यक्त केली. त्यामुळे राहुल गांधी यांनी स्पष्टपणे कोण मंत्री काम करत नाहीत असाही प्रश्न केला, पण त्यावर कोणीच उत्तर दिले नाही. तळागाळातल्या कार्यकर्त्यांकडे पक्षाचे लक्ष नसल्याने त्यांच्यामध्ये मोठय़ा प्रमाणात नाराजी असल्याचेही या वेळी राहुल यांच्या निदर्शनास आणून दिले गेले. तसेच महामंडळे, एससीओ यांच्यावर कार्यकर्त्यांच्या नेमणुका झालेल्या नाहीत, असेही कार्यकर्त्यांनी सांगितले व ही पदे लवकरात लवकर भरण्याची गरज यावेळी व्यक्त केली. कार्यकर्त्यांशी माटुंगा येथे संवाद साधताना राहुल गांधी यांनी पक्ष काही जिल्ह्यांमध्ये कमकुवत झाल्याचे मान्य केले. तसेच पक्षामध्ये समन्वयासाठी हवी असलेली यंत्रणा अस्तित्वात नसल्याचेही ते म्हणाले. काम करणार्‍या कार्यकर्त्यांकडे काँग्रेस पक्षामध्ये दुर्लक्ष होते आणि काम न करणार्‍यांना पुढे केले जाते, असेही त्यांनी या वेळी सुनावले. तळागाळातल्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळायला हवा. केंद्र सरकारच्या अनेक चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
अशोकरावांकडे विशेष लक्ष- माटुंगा येथे आमदार व खासदारांच्या उपस्थितीत ही सभा सुरू होण्याआधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व उद्योगमंत्री नारायण राणे यांना मंचावर बसवावे, असे राहुल गांधी यांनी माणिकराव यांना सांगताच माणिकराव यांच्या चेहर्‍यावरील भाव बदलले. मात्र, त्यांनी तत्काळ या दोन्ही नेत्यांना सन्मानाने मंचावर बोलावून घेतले. भाईदास सभागृहामध्ये यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी ‘आपण आता नेहमी महाराष्ट्रामध्ये येत राहू’, असे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुढे गेली असून काँग्रेसची ओळख केवळ भ्रष्टाचाराशी जोडली जाते, असे या वेळी एका कार्यकर्त्याने सांगितले. त्यावर उत्तर देताना राहुल म्हणाले की, ही आपली पहिलीच अशा प्रकारची भेट आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेस क्रमांक दोनवर गेल्याची वेगवेगळी कारणे लोक सांगतात. त्याचा आपण मतदारसंघाप्रमाणे आढावा घेऊ, असे त्यांनी सांगितले. या भेटीनंतर राहुल यांनी चैत्यभूमीलाही भेट दिली.
अगा जे घडलेचि नाही
- राहुल गांधी यांच्या बैठका संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन दिवसभराचा आढावा दिला. संघटना बांधणीसाठी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राहुल गांधी मुंबईमध्ये आल्याचे ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांबद्दल व्यक्त केलेली नाराजी, राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली मते तसेच काम करणार्‍या मंत्र्यांची नावे राहुल यांनी विचारली असता कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांचे नाव सांगितले, यावर मुख्यमंत्र्यांना विचारले असता, असे काहीच झाले नसल्याचे ते म्हणाले.
राहुल आज सातार्‍यात- दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राहुल गांधी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना शनिवारी भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदमही असतील. या गावांमध्ये रोजगार हमीची कामे, चारा डेपो, पाण्याची व्यवस्था आदींची ते या दौर्‍यामध्ये पाहणी करणार आहेत.
आपल्‍या पक्षाकडे लक्ष द्याः राष्‍ट्रवादीबाबतच्‍या तक्रारींवर राहुल गांधींचे कार्यकर्त्‍यांना उत्तर
राहुल गांधींचे आता 'ब्राह्मण' कार्ड
दिशाभूल केल्याने काँग्रेस पराभूत; यूपी नेत्यांचे राहुल गांधी यांच्याकडे गार्‍हाणेNext Article

Recommended