आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - ‘ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी गांधीजींना गोळ्या घातल्या, तेच लोक आता गांधीजींचा विचार मांडत आहेत’, अशा शब्दात कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संघ व भाजपवर निशाणा साधला. त्याचबरोबर काँग्रेसने नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेतल्याचा दावा करत नरेंद्र मोदींच्या एककेंद्री कार्यपद्धतीवरही जोरदार हल्ला चढवला.
ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी येथे झालेल्या जाहीर सभेत राहूल गांधींनी काँग्रेसने राबवलेल्या लोकप्रिय योजनांची उजळणी करत भाजपच्या दुटप्पी राजकारणावर टीका केली. ‘आधी विकासाला विरोध करायचा आणि मग तो विकास आपणच केला असा दावा करायचा हीच भाजपच्या राजकारणाची नीती आहे,’ असा आरोपही त्यांनी केला. ‘काँग्रेसला गाडून टाकण्याची भाषा करणा-यांना मी सांगू इच्छितो की काँग्रेस हा पक्ष नाही तर तो एक विचार आहे. त्यामुळे तो नष्ट होणार नाही तर तो परदेशातही पसरेल,’ असा दावाही राहूल यांनी केला.
चाय पे चर्चा... : महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनीही आपल्या भाषणात मोदींना लक्ष्य केले. ज्यांनी अजून संसदेचा दरवाजा पाहिला नाही त्यांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडत आहेत असा टोला लगावतानाच त्यांनी ‘ चाय पे चर्चा और दोसो करोड का खर्चा' असे म्हणत भाजपच्या उपक्रमाचीही खिल्ली उडवली.
17 पेक्षा जास्त जागा मिळवून - माणिकराव : मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या समस्येकडे लक्ष्य वेधत या जिल्ह्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातील असे जाहीर केले. राज्यात गेल्या पंधरा वर्षात आणि केंद्रात गेल्या दहा वर्षात झालेला विकास हाच आमच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल असेही ते म्हणाले. तर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यावेळी 17 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचे आश्वासन राहुल गांधींना दिले.
विकासाच्या मुद्द्यावर भर : भाजपच्या मोदीकेंद्री प्रचारावर टीका करत काँग्रेसने सर्वसमावेशक विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी आणला आहे. ‘आम्ही लोकांचे ऐकूनच रोजगार हमी, अन्नसुरक्षा योजना आणल्या. आमचे नेते शेतक-यांपर्यंत आले आणि हरितक्रांती साकारली, काँग्रेसच्या तेव्हाच्या युवा नेत्यांनी सांगितले म्हणून राजीवजींनी देशात कॉम्प्युटर आणला. त्यावेळी त्याला विरोध करणा-या भाजपवाल्यांनीच मग त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला,’ असा टोलाही राहुल गांधींनी लगावला.
आमचा असा एकही कर्यक्रम दाखवा ज्यात सर्वसामान्यांचा विचार नाही, असेही ते म्हणाले.
महिलांना प्राधान्य द्या
विरोधक जिथे जातात तिथे दंगली घडवतात, असा आरोप करत राहुल गांधींनी काँग्रेसने गेल्या दहा वर्षांत 15 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्यावर आणून त्यांचे जीवन सुकर केल्याचा दावा केला. पक्षात महिलांना अधिकाधिक प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी नेत्यांना दिल्या. संघटनेत पन्नास टक्के प्रतिनिधित्व महिलांना द्या, युवक आणि आदिवासींनाही राजकारणात पुढे आणण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.