आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi's Prime Minister Post Is If No, Nationalist Chairman Rise Question

राहुलचे पंतप्रधानपद हा ‘जर-तर’चा विषय!,नेतृत्वावर राष्‍ट्रवादी अध्यक्षांचे प्रश्नचिन्ह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कॉँग्रेसचे राष्‍ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करा, अशी मागणी काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी लावून धरली असून त्याला आता युवराजांनीही प्रतिसाद दिला आहे. ‘यूपीए’चा घटक पक्ष असलेल्या राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र राहुल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना या सर्व जर-तरच्या गोष्टी असून मला त्यावर भाष्य करावेसे वाटत नाही, अशी भूमिका घेतली.
राष्‍ट्रवादीतर्फे शरद पवार व माजिद मेनन यांनी शुक्रवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, आगामी सरकार बनवताना प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची असेल. मात्र पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मी नाही. माझ्या पक्षाच्या ताकदीची मला पूर्ण कल्पना आहे. सध्याची एकूण अस्थिर परिस्थिती पाहता त्रिशंकू सरकार येण्याची चिन्हे असली तरी तरी लढत यूपीए व एनडीए यांच्यातच असेल.
राज्य सरकार आता धावायला लागले!
पृथ्वीराज चव्हाण यांच्या संथ कारभारावर पवारांनी याआधी जोरदार टीका केली होती. फायली पडून राहिल्याने नेतृत्वाला लकवा मारला की काय, असा टोलाही त्यांनी जाहीर कार्यक्रमात लगावला होता. या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस राज्य सरकारकडून आठवड्यात दोन कॅबिनेट घेतल्या जात असून भराभर निर्णय होत आहेत. यावर पवार म्हणाले, ‘राज्य सरकारच्या कामात मला बदल झाल्याचे जाणवत आहे. पूर्वीपेक्षा जलदगतीने निर्णय होत आहेत.’
शिवसेनेच्या गंडेदो-यांवरील कारवाईकडे लक्ष
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेने शिवबंधनाचा कार्यक्रम करून शिवसैनिकांना पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली. हा प्रकार म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची पायमल्ली करणारा आहे, असे पवार म्हणाले. ‘प्रबोधनकारांनी आयुष्यभर पुरोगामी विचार मांडताना बुवाबाजी, गंडेदोरे यांना विरोध केला होता. नुकताच राज्यात अंधश्रद्धाविरोधी कायदा मंजूर झाला असून गंडेदो-यांवर राज्य सरकार काय कारवाई करते याकडे माझे लक्ष लागले आहे,’ असा टोला पवारांनी मारला.
उद्धव ठाकरेंचे ‘तू लढ,
मी कपडे सांभाळतो’
उद्धव ठाकरेंचे वागणे म्हणजे ‘तू लढ, मी कपडे सांभाळतो’ असा प्रकार आहे. ज्यांनी कधी अंगाला माती लावली नाही, अशा वाचाळवीरांबाबत असे बोलले जाते. उद्धव ठाकरे यांचेही तसेच आहे. त्यांनी कधी निवडणूक लढवलेली नाही. मात्र, मला ते शिरूरमध्ये निवडणुकीला उभे राहण्याचे आव्हान करत आहेत. गंमत म्हणजे या ठिकाणी स्वत: उभे न राहता आढळराव पाटील यांना माझ्याविरोधात लढवत आहेत. हा सगळा हसण्याचा प्रकार आहे, अशी बोचरी टीकाही पवारांनी केली.