आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नार्वेकरांनीही तोडले शिवबंधन,राष्ट्रवादीकडून मावळची उमेदवारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-विधान परिषदेतील उमेदवारीसाठी साथ न दिल्याने अतिशय नाराज झालेले शिवसेनेचे प्रवक्ते राहुल नार्वेकर यांनी अखेर शिवबंधन तोडले आणि थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले. विशेष म्हणजे, शिवसेना सोडल्याचे बक्षीस म्हणून राष्ट्रवादीने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाजतगाजत नार्वेकरांना मावळची उमेदवारी दिली.लोकसभा निवडणुका तोंडावर येत आहेत, तशी राजकीय धुळवड रंग धरत आहे. त्यातच धुळवडीचा मुहूर्त साधत राष्ट्रवादीने शिवसेनेला जोरदार धक्का दिला. सोमवारी सर्व जण रंगांत न्हाऊन निघाले असताना, राष्ट्रवादीने दुपारनंतर पत्रकार परिषद घेऊन नार्वेकरांची मावळची उमेदवारी जाहीर केली.
मावळची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नार्वेकरांनी प्रथम अजित पवारांचे आभार मानले. ते म्हणाले, विधान परिषद निवडणुकीत मी शिवसेनेचा उमेदवार असूनही अपक्षासारखा एकटा पडलो होतो. शिवसेनेतील लोकच मला निवडणुकीत पाडण्याच्या तयारीत होते. पक्षांतर्गत राजकारणाचा बळी ठरल्याने अखेर मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. मी शिवबंधन तोडले. पक्षात मी नवीन असूनही माझा थेट लोकसभा निवडणुकीसाठी विचार झाल्याने मी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचा ऋणी आहे.
मावळची उमेदवारी पक्षात आज दाखल झालेल्या नार्वेकरांना दिल्याने प्रसारमाध्यमांनी अजित पवारांना लक्ष्य केले. यावर पवार दादागिरीचा सूर लावत म्हणाले, मावळची जागा आमच्या वाट्याला आली असताना तेथे कोणाला उमेदवारी द्यायची हा आमचा निर्णय आहे. सुरेश लाड, दत्ताजी मासूलकर, योगेश बहल असे आमच्याकडे उमेदवार होते. मात्र, मावळमध्ये कोकणातील तीन, तर पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. याआधीचे खासदार गजानन बाब्बर हे कोकणातील असल्याने उरणच्या नार्वेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. मावळ मतदारसंघात उच्चशिक्षित उमेदवार द्यावा, ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची इच्छा होती.
नार्वेकर डमी उमेदवार!
मावळमधून लक्ष्मण जगताप यांना राष्ट्रवादी उमेदवारी देईल, असे सुरुवातीला वाटत होते. पण, अचानक जगताप यांचा पत्ता कापण्यात आला. जगताप हे तगडे उमेदवार होते. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले जगताप यांना शेकापने उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी गजानन बाब्बर यांच्याऐवजी शिवसेनेने युवा नेता श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिल्याने आता बारणे विरुद्ध जगताप असाच मुकाबला रंगेल, असे चित्र आहेत. नार्वेकर तर डमी उमेदवार असल्यासारखेच असतील, असे बोलले जाते. या प्रश्नावर पुन्हा एकदा चिडून अजित पवार म्हणाले, अजित पवार ज्या उमेदवाराच्या मागे उभे राहतात, तो उमेदवार डमी की कोण, हे काळच ठरवेल.