आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल नार्वेकरांसारख्या चमको नेत्यांनी केला शिवसेनेचा घात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात शिवसेना म्हणजे एक बंधन होते आणि त्यासाठी कुठल्याही शिवबंधनाची गरज नव्हती. बाळासाहेबांच्या एका आदेशाने शिवसैनिकच नव्हे, तर नेतेही बस म्हटले बसत आणि ऊठ म्हटले की उठत. शिवसेनेत लोकशाही नाही, हे ओरडून सांगण्याची त्या वेळी गरज नव्हती.. पण बाळासाहेबांकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्वाची धुरा गेल्यानंतर दरबारी चाणक्य मंडळींचा शब्द प्रमाण झाला आणि चमको नेत्यांचा उदो उदो झाला.. विशेष म्हणजे, अशा लोकांनीच शिवसेनेचा घात केला हे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झालेल्या राहुल नार्वेकरांनी दाखवून दिले आहे.
बोलण्यात चतुर, त्यातच अँडव्होकेट असल्याने युवा नेते नार्वेकरांनी शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंशी संधान बांधून ‘मातोश्री’वर आपले वजन उंचावले. आदेश बांदेकर, श्वेता परुळेकर अशा युवा नेत्यांच्या टीममध्ये असलेल्या राहुल नार्वेकर यांचे वडील खरे तर काँग्रेसचे नगरसेवक. कुलाब्यामधून चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले. घरची श्रीमंती आणि त्यातच सुरुवातीपासून राजकीय नेत्यांमध्ये ऊठबस असल्याने राहुल नार्वेकरांना राजकारण कशाशी खातात हे शिकण्यासाठी वेगळ्या शिकवणीची गरज कधी भासली नाही. म्हणूनच मुंबई महापालिका निवडणुकीत आपल्या भावाला मकरंद नार्वेकर यांना शिवसेना जागा देत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्याला अपक्ष म्हणून उभे केले. विशेष म्हणजे, त्याला निवडून तर आणलेच, पण शिवसेनेच्या अधिकृत नगरसेवकांना बाजूला सारून विधी समितीचे अध्यक्षही केले.
पक्षात ज्येष्ठ नेते असतानाही युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या युवकांना संधी देण्याच्या अट्टहासामुळे राहुल नार्वेकर यांना झटपट पदे मिळाली. युवा सेना नेते, शिवसेनेचे प्रवक्ते यामुळे नार्वेकर कायम प्रकाशझोतात राहिले. मात्र, त्याचवेळी रस्त्यावर उतरून पक्षासाठी खस्ता खालेल्यांना दुय्यम फळीतच समाधान मानण्याची वेळ आली. अँडव्होकेट असल्याने हजरजबाबीपणा, त्यातच इंग्लिश बोलता येत असल्याने चॅनलवरून पक्षाची भूमिका मांडण्याची मोठी संधी मिळाल्याने नार्वेकरांना आभाळाला हात टेकल्यासारखे वाटू लागले होते.
रायगड जिल्हय़ातील उरणमधील नार्वेकरांना खरे तर लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी मनोहर जोशी यांना हाताशी घेऊन आधी रत्नागिरी, रायगडचे खासदार अनंत गितेंविरोधात षड्यंत्र रचून पाहिले. मात्र, गितेंसारखा नेता गमावून शिवसेनेला चालण्यासारखे नसल्याने नार्वेकरांची तेथे डाळ शिजू शकली नाही. त्यानंतर विधानसभेची उमेदवारी मागताच त्यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी देण्यात आली. मात्र, तेथे काँग्रेसच्या उमेदवारासमोर डाळ शिजू शकली नाही. याचवेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या आमदार किरण पावसकरांचीही नार्वेकर यांना मोठी मदत झाली. पदांसाठी, आमदार- खासदारीकीसाठी पक्षात आलेल्या आयाराम गयाराम लोकांनी शिवसेनेचा गेल्या काही वर्षांत मोठा विश्वासघात केला आहे. पक्षातील नेतेच नव्हे, तर कार्यकर्ते काय महान कार्य करता, याची माहिती घेण्याचे बाळासाहेबांचे स्वत:चे असे एक नेटवर्क होते. पण, उद्धव ठाकरे यांनी दरबारी तसेच काही मोजक्या नेत्यांच्याही पलीकडे राज्याच्या कानाकोपर्‍यात शिवसेना आहे, हे वास्तव लक्षात घेतलेले नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे शिवबंधनाला गेलेला तडा होय..
निंबाळकरांचे पक्षातील वजन कामाला आले
खरेतर नार्वेकरांना नाराज होण्याचे काही कारण नव्हते. अशा गोष्टी तर होतच राहतात. मात्र, यामागे त्यांची प्रचंड महत्त्वाकांक्षा लपली होती. राष्ट्रवादीचे मंत्री रामराजे निंबाळकर यांचे जावई असलेल्या नार्वेकरांना विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचे होते. त्याची तयारीही झाली होती. पण, त्यांना थांबा आणि वाट पाहा, अशा सूचना देण्यात आल्या. निंबाळकरांचे पक्षातील वजन कामाला आले आणि नार्वेकरांना मावळमधून थेट लोकसभेची उमेदवारी मिळाली.
पराभवाच्या भीतीने शिवसेनेनेच घेतली माघार
खरेतर पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांच्या तुलनेत उणीपुरी काही वर्षे पक्षात येऊन झाली असताना शिवसेनेने नार्वेकरांसाठी खूप काही दिले. पण, आपल्याला काही तरी मिळाले पाहिजे, या अट्टाहासापायी नार्वेकर शेवटी विधान परिषद निवडणुकीला उभे राहिले. शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येणे अशक्य होते. मात्र, तरीही आपण ही जागा जिंकून आणू, असा पक्षश्रेष्ठींना विश्वास देत त्यांनी अर्ज भरला. पण, जिंकून येणे शक्य होत नाही, हे लक्षात येताच शिवसेनेने त्यांना माघार घेण्यास सांगितली. मात्र माघार घेण्यास लावल्याने नार्वेकर दुखावले.