आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठाण्यात तीन बाेगस काॅलसेंटरचा केला पाेलिसांनी पर्दाफाश, ७० आरोपी अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमेरिकन नागरिकांना ते कर थकबाकीदार असल्याचे खोटे सांगत कायदेशीर कारवाईचा धाक दाखवून पैसे उकळणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला. मीरा भाईंदर येथील तीन कॉलसेंटर्समधील ७७२ कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने गेल्या अनेक दिवसांपासून ही फसवणूक सुरू होती. या प्रकरणी ८ प्रमुख आरोपींसह तब्बल ७० जणांना अटक करण्यात आली असून १ कोटींचा मुद्देमालही जप्त करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे.

ठाणे ग्रामीण परिसरात बनावट कॉलसेंटर्सद्वारे तोतयेगिरीने अमेरिकन नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. अमेरिकन नागरिकांना या बनावट कॉलसेंटर्समधून फोन करून आपण अमेरिकन इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिसेसमधील अधिकारी बोलत असल्याचे सांगितले जात असे. तुम्ही कर थकबाकीदार असून तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत अाहे,असे सांगत लवकरच तुम्हाला अटक करण्यात येणार असल्याचे सांगून दम दिला जात असे. तुम्हाला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून त्यामुळे तुमचा सोशल सिक्युरिटी क्रमांक गोठवला जाणार आहे. याशिवाय वाहन परवानाही रद्द केला जाणार असून नोकरीवरही गदा येऊ शकते, असे सांगून दंडापोटी १० हजार डॉलर्सची मागणी करण्यात येत असे. मग त्यापेक्षा कमी रकमेवर तोडगा काढून ती रक्कम टार्गेट गिफ्टकार्डद्वारे किंवा आय ट्यून्सद्वारे वसुल करण्यात येत असे.

या माहितीची सत्यता तपासल्यानंतर गुन्हे शाखेच्या ४० अधिकाऱ्यांसह तब्बल १२० पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी रात्री तिन्ही कॉल सेंटर्सवर एकाच वेळी छापा टाकला. मिरारोड पूर्वेला युनिव्हर्सल आऊटसोअर्सिंग सर्विसेस, ओसवाल हाऊस आणि शिवार गार्डन या ठिकाणी टाकलेल्या या छाप्यांमध्ये ७७२ लोकांना ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे छाप्याच्या वेळी अनेक काॅल टेकर, काॅल होल्डर आणि कॉल क्लोजर अमेरिकेतील अनेक नंबर्सवर बोलत असल्याचे दिसून आले.

त्या सोबतच ८५१ हार्डडिस्क्स, डायमंड सर्व्हर्स, डिव्हीआर आणि लॅपटॉपमधील अनेक रेकॉर्डेड व्हॉईस काॅल आणि गुन्ह्यांद्वारे मिळवलेल्या पैशांच्या हिशोबाची कागदपत्रेही पोलीसांनी या कारवाईदरम्यान जप्त केली. तसेच काही मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे असा एकूण एक कोटींचा मुद्देमालही जप्त करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलीस अायुक्त परमबीर सिंह यांनी दिली.

अमेरिकन नागरिकांची फसवणुक केल्याप्रकरणी ठाणे पोलीसांनी हैदरअली अयुब मंन्सुरी, शाहिन उर्फ हमजा इक्बाल बालेसार, कबीरबर्धन उल्हास गुप्ता, अर्जुन नरेश वासुदेव, अब्दुल्ला शौकत झरीवाला, जाॅन्सन सुप्रियम डॉन्टोन्सा, गोविंद मनोज ठाकूर आणि अंकित अनिल गुप्ता या आठ प्रमुख आरोपींसह एकूण ७० आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींवर माहिती तंत्रज्ञान कायदा, इंडियन टेलीग्राफ अॅक्ट या कायद्यान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणी आणखीही काही व्यक्तींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...