आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उरणमध्‍ये तीन संशयित पोलिसांच्‍या ताब्‍यात; शोधमोहिम सुरुच, मुंबई, नवी मुंबईत हायअलर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -रायगड जिल्ह्यातील उरणच्या नौदल तळाजवळ पाच ते सहा बंदूकधारी व्यक्ती संशयित हालचाली करताना आढळल्यानंतर संपूर्ण मुंबई किनारा व आसपासच्या परिसरात हायअलर्ट जारी करण्‍यात आला. आता उरणमधील गव्हाण गावातून तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली. हे तीन संशयित कोण आहेत, त्यांचा उरणमधील घटनेशी संबंध आहे का, याचा तपास पोलिस घेत आहेत. पोलिसांनी दोन संशयितांची रेखाचित्रे जारी केली होती. गुरुवारी सकाळी उरणमध्‍ये 4 संशयित घुसल्याचे सांगण्यात येत होते. शाळकरी विद्यार्थिनींनी संशयितांकडे बंदूका असल्याची माहिती दिली होती.
रायगड जिल्ह्यातील उरणच्या नौदल तळाजवळ पाच ते सहा बंदूकधारी व्यक्ती संशयित हालचाली करताना आढळल्यानंतर संपूर्ण मुंबई किनारा व आसपासच्या परिसरात हायअलर्ट जारी झाला आहे. घटनेनंतर अनेक तपास संस्थांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.

उरणसंदर्भात सर्व अहवाल उद्यापर्यंत सादर करा, असे गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी पोलिस महासंचालकांना आदेश देण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी संंशयितांंचे रेखाचित्र जारी केले आहे. पोलिस, नौदलासह NSG, IB, ATS कडूनही शोधमोहिम सुरु आहे. मुंबईसह नवी मुंबईत हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
उरणमध्ये क्यूआरटी, क्राईम ब्रान्च, नौदल, पोलिस, कोस्टल पोलिस सीआयएसएफची तुकडी यांचे एकत्रित सर्च ऑपरेशन सुरु आहे.

उरीमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १८ सैनिक शहीद झाल्याच्या घटनेला चारही दिवस उलटले नाही तोच उरण नौदल तळाजवळ सशस्त्र लोकांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्याने हा हाय अलर्ट जारी करण्यात आला. शोधमोहीम सुरू करण्यात आली असून संशयितांचा सुगावा लागलेला नाही. या घटनेनंतर एनएसजी, फोर्स वन हे राज्य सरकारचे विशेष प्रशिक्षित पोलिस दल आणि एटीएस, नौदलाचे मार्कोस हे मरीन कमांडोज, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा यासारख्या दलांना शोधमोहीम आणि सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. या माध्यमातून व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली असल्याचे भारतीय नौदलाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कॅप्टन डी. के. शर्मा यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच नौदलाने तातडीने हाय अलर्ट जारी केला आणि किनारपट्टीच्या सर्व संस्थांना माहिती दिली, असे नौदलाचे प्रवक्ते कमांडर राहुल सिन्हा म्हणाले. किनारपट्टीच्या सर्व पोलिस ठाण्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी सांगितले.

उरण परिसरात अनेक संवेदनशील ठिकाणे
पश्चिम नौदल कमांडने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड या किनारपट्टीच्या परिसरात ‘अत्यंत दक्षतेचा इशारा’ जारी केला आहे. या परिसरात अनेक संवेदनशील प्रतिष्ठाने आणि मालमत्ता आहेत. उरण परिसरात पश्चिम भारतातील सर्वात मोठा नौदल तळ, भाभा अणु संशोधन केंद्र, खत निर्मिती प्रकल्प, वीजनिर्मिती प्रकल्प आणि देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर जेएनपीटी वसलेले आहे.

उरणमध्येच नौदलाचे मार्कोस
मुंबईच्या पूर्वेला किनारपट्टीवर उरण वसलेले आहे. नौदलाचा तळ शहराला लागूनच आहे. येथेच नौदलाचा मार्कोस हा एलिट स्ट्राइक फोर्स आहे.

२६/११ च्या हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर किनारपट्टीची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्यक्रमावर आहे. या हल्ल्यसाठी पाकिस्तानी दहशतवादी समुद्र मार्गेच आले होते आणि त्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणांना लक्ष्य केले होते.

किनारपट्टी सुरक्षेसाठी त्रिस्तरीय नेटवर्क
त्रिस्तरीय नेटवर्कद्वारे किनारपट्टीची सुरक्षा केली जाते. स्थानिक पोलिसांची कोस्टल पोलिस ठाणी, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील कोस्ट गार्ड आणि खोल समुद्रात नौदल पेट्रोलिंग करते.

शाळकरी विद्यार्थ्यांनी पाहिल्या संशयित व्यक्ती
उरणच्या करंजा जेट्टीजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास उरण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांना पाच ते सहा बंदूकधारी व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळल्या. शाळेत गेल्यावर त्यांनी वर्गशिक्षिकेला ही माहिती दिली. वर्गशिक्षिकेने मुख्याध्यापिका स्वाती शिराळकर व संस्थेच्या अध्यक्षांच्या कानावर हा प्रकार घातला. काही वेळानंतर याच शाळेच्या अकरावीतील एका विद्यार्थ्यानेही या संशयितांना पाहिल्याचे सांगितल्याने गांभीर्य वाढले. या सर्व विद्यार्थ्यांनी सांगितलेले संशयितांचे वर्णन जुळत असल्याने अध्यक्षांनी सकाळी साडेसातच्या सुमारास उरण पोलिसांना कळवले व
यंत्रणा तातडीने कामाला लागल्या. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे अधिकाऱ्यांसह उरणला गेले. त्यांनी या विद्यार्थ्यांना भेटून माहिती घेतली.
पठाणी वेश अाणि पाठीवर बॅकपॅक्स : हे संशयित पठाणी वेशात होते. त्यांच्या हातात बंदुका आणि पाठीवर बॅकपॅक्सही होते, असे नौदलाचे प्रवक्ते कमांडर राहुल सिन्हा यांनी येथे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. काहींच्या मते हे पाच ते सहा संशयित लोक भारतीय लष्कराच्या गणवेशात होते.

हवाई पाळत, जहाजांचे पेट्रोलिंग
नौदलाचे हेलिकॉप्टर्स हवाई पाळत ठेवून आहेत. नौदलाची जहाजे आणि स्पीड बोटींद्वारे अरबी समुद्रातील पेट्रोलिंगही वाढवण्यात आली आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
अशा प्रकारच्या कारवाईबाबतची माहिती गोपनीय ठेवली जाते. मात्र सर्व संबंधित यंत्रणांनी परिसराचा ताबा घेऊन शोधमोहीम सुरू केली अाहे. या माहितीमुळे कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. तसेच कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि अफवा पसरवण्याचा प्रयत्नही करू नये.
-दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...