आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गांधीजींनी १०० वर्षांपूर्वी मांडलेल्या रेल्वे प्रवाशांच्या व्यथा आजही कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महात्मा गांधी यांच्या जीवनात रेल्वेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मोहनदास गांधी ते महात्मापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाला दक्षिण अफ्रिकेतील एक रेल्वे प्रवासच कारणीभूत ठरला. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या व्यथा व समस्या गांधीजींनी १०० वर्षांपूर्वी एका पत्रकाद्वारे मांडल्या होत्या. विशेष म्हणजे गांधीजींनी तेव्हा मांडलेल्या रेल्वे प्रवाशांच्या समस्या आजही बऱ्याच प्रमाणात कायम आहेत.

गांधीजींनी या पत्रकाद्वारे रेल्वे अधिकारी, कर्मचारी, रेल्वे पोलिस आणि रेल्वे प्रवाशांना काही सूचना केल्या होत्या. मूळ गुजराती भाषेत लिहिलेल्या या पत्रकांच्या प्रती त्या वेळी गुजरातेतील अनेक शहरांत मोफत वाटण्यात आल्या होत्या. याशिवाय ‘काठियावाड टाइम्स’ या वर्तमानपत्रात २६ जुलै १९१६ रोजी हे पत्रक छापून आले होते. गांधीजी या पत्रकात म्हणतात,”भारतीयांचा रेल्वे प्रवास हा नि:संशयपणे खडतर असतो, याबाबत दुमत नसावे. पण आपण सर्वांनीच काही बाबींचे पालन केले तर हा प्रवास काहीसा सुकर होऊ शकेल. जर तुम्ही स्टेशन मास्तर, तिकीट संग्राहक किंवा तिकीट बुकिंग क्लर्क असाल तर रेल्वे प्रवाशांशी कायम सौजन्याने वागा. काही तिकीट बुकिंग क्लर्क सामान्य प्रवाशांशी तुसडेपणाने वागतात आणि त्यांची शक्य तेवढी अडवणूक करतात. हे चुकीचे आहे. जेवढा वेळ तुम्ही प्रथम किंवा द्वितीय दर्जाच्या प्रवाशांना देता तेवढा वेळ तिसऱ्या वर्गातील प्रवाशांनाही द्या. कारण त्यांच्याही तिकिटाच्या पैशांमुळे तुम्हाला पगार मिळतो.’ रेल्वे पोलिसांना उद्देशून गांधीजी म्हणतात की तुम्ही लाचखोरीपासून दूर राहा. प्रवाशांशी नीट वागा. तुम्ही त्यांचे सेवक आहात, मालक नव्हे, याचे भान ठेवा.

विशेष म्हणजे या पत्रकात गांधीजींनी फक्त रेल्वे अधिकारी आणि पोलिसांनाच नव्हे तर सुशिक्षित रेल्वे प्रवाशांनाही काही सूचना केल्या आहेत. गरीब आणि अशिक्षित प्रवाशांना मदत करणे हीसुद्धा एक देशसेवाच आहे. काही वेळा पहिल्या वर्गात प्रवास करणाऱ्या तुमच्यासारख्या प्रवाशांना प्रवासादरम्यान अगदी तिकीट घेण्यापासून जागा पटकावण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत प्राधान्य हवे असते; पण त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गातील प्रवाशांना त्रास होऊ शकतो, ही बाब ध्यानात घ्या, असेही गांधीजींनी नमूद केले आहे. या शिवाय रेल्वेत प्रवेश करताना एकदम गर्दी करण्याऐवजी रांगेचा वापर करा, गाडीत जागा नाही म्हणून इतरांना प्रवेश करण्यापासून रोखू नका, गाडीत धूम्रपान करू नका, थंुकू नका, गाडीतील प्रसाधनगृहांचा वापर करताना सामाजिक भान बाळगा, अशा अनेक सूचनाही त्यांनी सामान्य प्रवाशांना केल्या आहेत.

प्रवाशांबाबत गांधीजींना आस्था
गांधीजींच्या आयुष्यात रेल्वेला एक आगळे महत्त्व आहेच. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबद्दल गांधीजींना कायमच आस्था होती. या समस्यांच्या निराकरणासाठी त्यांनी अनेक वेळा रेल्वे अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. हे पत्रकही गांधीजींच्या रेल्वे प्रवाशांच्या समस्यांचाच परामर्श घेताना दिसते.
- बी. आर. बाेबडे, गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव
बातम्या आणखी आहेत...