आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निम्म्यापेक्षा कमी पाऊस झालेल्या तालुक्यांना प्रत्येकी 50 लाखांचा निधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील ज्या तालुक्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा तालुक्यांत जल व मृदसंधारणाच्या कामांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. महात्मा जोतिबा फुले जल व मृदसंधारण अभियानांतर्गत हा निधी खर्च करण्यात येणार असून 31 ऑक्टोबरपर्यंत या निधीतून कामे पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.
राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शासनाने हा निर्णय घेतला असून त्यात राज्यासाठी एकूण 45 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अन्य तालुक्यांतही अशी कामे व्हावीत यासाठी जिल्ह्याला 30 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. लोकसहभागाला यामध्ये प्राधान्य देण्याचे आदेश शासनाने दिले असून प्रसिद्धी व या कामासाठी लागणारी यंत्रणा भाड्याने घेण्यासाठी या निधीचा वापर करता येणार आहे.
या अभियानांतर्गत जल व मृदसंधारण कामाची दुरुस्ती, कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍याला दरवाजे बसवणे, विविध छोट्या पाणी प्रकल्पांतील गाळ काढणे, वनराई व कच्चे बंधारे बांधणे, समतल चर काढणे, विहीर पुनर्भरण करणे या कामांचा समावेश करण्यात येणार आहे. या अभियानामध्ये लोकसहभाग वाढावा यासाठी 5 कोटी रुपये खर्च करून अभियानाची प्रसिद्धी करण्यात येणार असून राज्यातील प्रत्येक तालुक्याला त्यासाठी 1 लाखांचा विशेष निधी यातून देण्यात आला आहे. तसेच उर्वरित निधीतून राज्यात प्रसिद्धी मोहीम राबवण्यात येणार आहे.