आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३१ दिवसांनी परतला पाऊस, औरंगाबादसह नाशिकमध्ये पुनरागमन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / औरंगाबाद- तब्बल महिनाभरापासून गायब झालेल्या पावसाने सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळपासून राज्याच्या मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह काही भागात पुनरागमन केल्यामुळे जीव टांगणीला लागलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हसू फुलले.

सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईत धो धो पावसाला सुरुवात झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबादेत मंगळवारी पावसाने हजेरी लावली. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक जिल्ह्यातही पाऊस होत आहे. असे असले तरी मराठवाड्याचा ९५ टक्के भाग अजूनही कोरडाच असून दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
मुंबईत मुसळधार बरसणारा पाऊस राज्याच्या उर्वरित भागातही सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महिनाभरापासून पावसाची चातकासारखी वाट पाहणारे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकही आनंदले आहेत. सोमवार-मंगळवारच्या पावसामुळे कपाशी, मूग, उडीद, तूर, मका, साेयाबीन पिकांना जीवदान मिळाले आहे. पण दुबार पेरणी टाळण्यासाठी किमान ३० ते ४० मि. मी. पाऊस गरजेचा आहे. औरंगाबादेत मंगळवारी दुपारी जोरदार, तर जालना व उस्मानाबादेत हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. जालना व घनसावंगी तालुक्यातील बहुतांश भागात पावसाला सुरुवात झाली, तरी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

नांदेड जिल्ह्यात चार-पाच दिवसांपासून दररोज आकाशात ढगांची नुसती गर्दी होत आहे. केवळ रिमझिम पाऊस होऊन ढग बेपत्ता होत आहेत. मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यातही हलक्या पावलांनी पुनरागमन झाले. दुपारी ३ वाजेच्या सुमारास उस्मानाबाद शहरात हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता तुळजापूर शहरात रिमझिम बरसला. मात्र, बहुतांश ग्रामीण भाग कोरडाच होता.

मुंबईत ३३.२० मि.मी. :
शनिवारपासून मुंबईत पावसाच्या हलक्य सरी येत होत्या. सोमवारी हवामानात मोठा गारठा जाणवत होता. मध्यरात्रीपासुन जोरदार सरींना सुरुवात झाली. सकाळी आठपर्यंत शहर परिसरात ३३.२० मिमी, पूर्व उपनगरात ६४.८६ िममी तर पश्चिम उपनगरात ६६. ५५ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

२५ जुलैपर्यंत मान्सून सक्रिय
पुणे वेधशाळेच्या मते, पश्चिम किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा व मध्य प्रदेशाच्या उत्तर भागातील कमी दाबाचे क्षेत्र यांच्या एकत्रित परिणामामुळे महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला.

२२ व २३ जुलै मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक सरींची शक्यता
२४ व २५ जुलै मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी.
२१ ते २३ जुलै कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य.

विदर्भात चांगला, मराठवाड्यात मध्यम
स्कायमेटच्या मते, मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. आता कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल. २३ ते २५ जुलै या काळात विदर्भात चांगला तर मराठवाड्यात मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

यंदाचा खरीप चांगलाच
देशात गतवर्षीपेक्षा यंदा खरीप चांगला राहील असे इंडिया रेटिंग्ज संस्थेने म्हटले आहे. गतवर्षीच्या १५ जुलैच्या तुलनेत यंदाच्या खरिपात ८.७२ % पेरा जास्त आहे. देशात १७ जुलैपर्यंत ५६.३३ दशलक्ष हेक्टर्सवर पेरणी झाली. गतवर्षी याच काळात ३४.६३ दशलक्ष हेक्टर्सवर पेरा झाला होता.
असे हवे पीक नियोजन
नव्याने व दुबार पेरणी करताना संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर + सोयाबीन, बाजरी + तूर , एरंडी + धने, एरंडी + तूर पेरणी करा. कापूस, संकरित ज्वारी, भुईमूग शक्यतो टाळावे, असे औरंगाबादच्या विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. एस. बी. पवार म्हणाले.
पावसासाठी पण निसर्गाच्याच विरोधात शेतकऱ्यांचे उपोषण!
नांदेड/ बीड | सलग चार वर्षांच्या दुष्काळाने त्रस्त झाल्यामुळे मराठवाड्यातील दोन शेतकऱ्यांनी उपोषण सुरू करून निसर्गालाच आव्हान दिले आहे. नायगाव तालुक्यातील भोपाळा येथील व्यंकटी हत्तीनगरे यांनी हनुमान मंदिरात तर बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील भाटुंबा येथील नवनाथ महाराज चवरे यांनी चक्क स्मशानभूमीतच निसर्गाच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. व्यंकटीला २ एकर शेती आहे. घरी पत्नी, मुलगा, मुलगी असे कुटुंब. परंतु दुष्काळाने घरात खाण्याचीही सोय नाही. भुकेने व्याकूळ होऊन मरण्यापेक्षा निसर्गाला आव्हान देऊन मरण्याचा संकल्प त्याने सोडला. हत्तीनगरे यांनी गेल्या आठ दिवसांपासून तर चवरे नऊ दिवसांपासून गावातील हनुमान मंदिरात चक्क पावसासाठी बेमुदत उपोषण सुरू केले. भाटुंब्याचे नवनाथ महाराज चवरे यांनी वरुणराजाच्या विरोधात स्मशानभूमीतील मारुतीच्या मूर्तीसमोर नऊ दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. पाऊस पडल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा पणच त्यांनी केला आहे. जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही खाणार नाही, वेळ आलीच तर झाडांचा पाला खाईन, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे. महाराजांनी हे उपोषण थांबवावे यासाठी मंगळवारी अंबाजोगाई येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुदंडा, माजी सभापती चवरे यांनी विनंती केली. महाराजांनी मात्र उपोषण सोडण्यास नकार दिला. नेहमीप्रमाणे प्रशासनाला उशिरा जाग आली. केजच्या तहसीलदारांनीही उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
बातम्या आणखी आहेत...