आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठण तालुक्यात तासभर गारपीट; राज्यातही दमदार पावसाची हजेरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जालना, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि हिंगोली जिल्ह्यांत पावसाने सोमवारी दमदार एंट्री केली. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील टाकळी अंबड, हिरडपुरी आणि उंचेगाव परिसरात सायंकाळी तासभर गारपीट झाली. सोयगाव, पिशोर व पाचोड परिसरात तुफान पाऊस झाला.

जालना, परतूरमध्ये रात्री 8.15 वाजता पाऊस सुरू झाला. दरम्यान, अंबाजोगाईत वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला, तर नांदेड जिल्ह्यात उमरी येथे 40 वर्षीय महिला दगावली. उस्मानाबाद जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरू असून सोमवारी ढोकी, तडवळे परिसरात वा-याने झाडे उन्मळून पडली. पुणे-लातूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. तेरणा नदीला पाणी आले.

चार महिन्यांपासून दुष्काळाचे चटके सोसत असलेल्या महाराष्ट्रात शनिवार- रविवारपासून पावसाने हजेरी लावत मान्सूनची वर्दी दिली आहे. सोमवारी पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, सोलापूर, साता-यासह राज्यातील अनेक भागांत दमदार रोहिण्या बरसल्याने उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांसह बळीराजाही खुश झाला आहे. या मान्सूनपूर्व पावसाचा काही भागाला फटकाही बसला असून त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. काही घरांवरही पत्रेही उडाले.

सातार्‍यात बत्ती गुल
सातारा जिल्ह्यात सोमवारी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांतही मध्यम ते हलक्या सरी कोसळल्याने तेथील बळीराजा सुखावला आहे. रविवारी रात्रीपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सातारा, वाई, महाबळेश्वर,पाचगणी, फलटण, खंडाळा या भागात वादळी वार्‍यासह पाऊस बरसला. सातार्‍याच्या प्रमुख रस्त्यावर पाणी साचले होते, काही दुकानांमध्येही पाणी शिरले होते. पहिल्याच पावसाने शहराची बत्ती गुल झाली होती.

नाशिक जिल्ह्यात पिकांचे नुकसान
नाशिक जिल्ह्यात सोमवारी सलग दुसर्‍या दिवशी वळवाच्या पावसाने कमीअधिक प्रमाणात हजेरी लावल्यामुळे नागरिकांसह शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सुरगाणा तालुक्यात सोमवारी दुपारी सुमारे 25 मिनिटे पाऊस बरसला. या भागात रविवारीही वादळी वार्‍यासह पाऊस झाला होता. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता, तो सोमवारीही बंदच होता. निफाड शहर व परिसरातही रविवारी मध्यरात्री दमदार पावसाने हजेरी लावली. एकूण 45 मिमी पावसाची नोंद झाली. मनमाड परिसरातही रविवारी मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह पाऊण तास पाऊस झाला. शहराचा वीजपुरवठाही त्यामुळे खंडित झाला होता. कळवण तालुक्यात कांदा, डाळिंब, टोमॅटो, मिरची आदी पिकांचे मोठे नुकसान झाले, तर काही घरांवरील पत्रेही उडाले, भिंती कोसळल्या.

कोल्हापुरात जोरदार सरी
सोमवारी कोल्हापूर शहरात दोन वेळा पावसाने हजेरी लावली. दोनच्या सुमारास जोरदार सरी आल्या. त्यानंतर पुन्हा साडेचारनंतर सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. चार दिवसांत बाराही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली आहे.

बारामतीतही दमदार
सोमवारी दुपारी चार वाजेपासून बारामती परिसरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पारा 33 अंशांपर्यंत घसरला होता. तीन दिवसांपासून तालुक्यात रिमझिम सुरू आहे.

जामनेरला चक्रीवादळाने 40 झाडे उन्मळली
जळगाव- जामनेर शहराला सोमवारी सायंकाळी पावसासह चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. यात जवळपास 15 ते 20 विजेचे खांब, 30 ते 40 झाडे उन्मळून पडली आहेत. शहराचा वीजपुरवठा खंडित झाला असून जामनेर-जळगाव रस्त्यावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. सायंकाळी 5.30 वाजेदरम्यान अचानक वातावरण बदलून जोरदार चक्रीवादळ झाले. पळासखेड्याकडून आलेले हे वादळ भुसावळ रोडकडे वळले. जामनेर शहरात फक्त 10-15 मिनिटे चाललेल्या या वादळात जळगाव रोड, वाकी रोड, हिवरखेडा रोडसह शहरातील विविध भागांत जवळपास 40 पेक्षा अधिक वृक्ष उन्मळून पडले. तसेच 30 विजेचे खांब कोसळून अनेक ठिकाणच्या तारा तुटल्या.