आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात ६५ % पाऊस, गतवर्षीपेक्षा ५२% कमी, २६ जूननंतर चांगल्या पावसाची अाशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असून त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. एक ते २१ जूनअखेर राज्यात सरासरी ६५.२ मि.मी. एवढा पाऊस झाला असून तो जूनच्या सरासरीच्या ४१.७ टक्के एवढा आहे. गेल्या वर्षी याच सुमारास म्हणजे जून महिन्यात सरासरीच्या ९३.१ टक्के पाऊस झाला होता.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या पाच जिल्ह्यांत जून महिन्यात शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नाेंद अाहे. रायगड, सोलापूर सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड जिल्ह्यांत ७६ ते १०० टक्के; अहमदनगर, परभणी, हिंगोली, अकोला, वाशीम, अमरावती जिल्ह्यांत ५१ ते ७५ टक्के; ठाणे, पुणे, जालना, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत २६ ते ५० टक्के आणि पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांत केवळ शून्य ते २५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

पीक पेरणीचे क्षेत्र : राज्यातील खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र (ऊस पीक वगळून) १३९.६४ लाख हेक्टर आहे. पूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर विभागात पेरणीस सुरुवात झाली.

धरणात नऊ टक्के पाणी : राज्याच्या जलाशयातील सर्व प्रकल्पांत २१ जूनअखेर केवळ नऊ साठा शिल्लक असून गेल्या वर्षी याच सुमारास १७ टक्के पाणी साठा होता. विभागनिहाय सध्याचा आणि कंसात गतवर्षीचा साठा पुढीलप्रमाणे- मराठवाडा- १ टक्के (७), कोकण- २८ टक्के (३०), नागपूर- १६ टक्के (२०), अमरावती-१० टक्के (२५), नाशिक- ८ टक्के (१५) आणि पुणे- ७ टक्के (१९).

६१३० टँकरने पाणीपुरवठा : राज्यातील ४९८२ गावे आणि ७८६२ वाड्यांना २० जूनपर्यंत ६१३० टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील २९३५ गावे आणि ९७७ वाड्यांचा समावेश असून त्यांना ३९६८ टँकर्सच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा होत आहे. मागील वर्षी याच सुमारास राज्यात १९९९ एवढी टँकर्सची संख्या होती.

चारा छावण्यांमध्ये घट : समाधानकारक पाऊस पडल्याने हिरव्या चाऱ्याची उपलब्धता झाली आहे. तसेच शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. त्यामुळे बीड, लातूर, उस्मानाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांत सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांच्या संख्येत घट झाली आहे. बीड जिल्ह्यात एक, उस्मानाबाद चार, अहमदनगर ३५, लातूर चार सांगली १ आणि परभणी १ याप्रमाणे १६ जूनअखेर एकूण ४६ चारा राज्यात छावण्या सुरू अाहेत. त्यात एकूण ४७ हजार ३३ जनावरे आहेत. मे महिन्यात चारशे छावण्या सुरू हाेत्या.

अजूनही पेरणीची घाई करू नये - मुख्यमंत्री
राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असले तरी काही ठिकाणी पेरणीसाठी पुरेसा पाऊस नाही. तसेच हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही भागात २६ जूननंतर चांगला पाऊस अपेक्षित आहे. पेरणीची घाई केल्यास दुबार पेरणीचे संकट उद‌्भवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...