आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायानगरीवर पाऊस मेहेरबान, वाहतुकीचे मात्र हाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अख्खा जून महिना पाठ फिरवलेल्या वरुणराजाने बुधवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड परिसरास झोडपून काढले. या पहिल्याच दमदार पावसाने वाहतुकीचा मात्र खोळंबा झाला. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली, रस्त्यांवरील सखल भागातही पाणी साचल्याने अनेक वाहने रस्त्यातच अडकून पडली. काही ठिकाणी वृक्षेही उन्मळून पडली होती. त्यामुळे सकाळी कामावर निघालेले चाकरमाने दुपारनंतरच कार्यालयात पोहोचले.

बुधवारी पहाटेपासून मुंबई परिसरात दमदार पावसाला सुरुवात झाली. सकाळ 10 पर्यंत पावसाच्या सरींवर सरी कोसळत होत्या. दमदार पावसाने कुर्ला परिसरात रुळांवर पाणी साचले. त्यामुळे सिग्नलयंत्रणा बंद पडली आणि हार्बर लोकलची चाके जागी थांबली. त्यामुळे पनवेलकडून येणार्‍या प्रवाशांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागला. हार्बर लोकल बंद पडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. किमान दोन तास लोकल विलंबाने धावत होत्या. दुपारपर्यंत 90 लोकल फेर्‍या रद्द कराव्या लागल्या. मुंबईस पाणीपुरवठा करणार्‍या सातही धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे गुरुवारपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण शहरात 20 % पाणीकपात लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेतला आहे.

विमानसेवेला फटका
या पावसाचा फटका देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेसही बसला. दुपारपर्यंत विमानांची सर्व उड्डाणे 20 मिनिटे विलंबाने होत होती. मुंबईतील नाल्यामधून 40 मि. मी. पर्यंतच्या पावसाचा निचरा होऊ शकतो, परंतु आजचा पाऊस 80 मि.मी. पेक्षा अधिक होता. त्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे लोकांना गुडघ्याइतक्या पाण्यातून वाट काढावी लागली.

शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांची मोठे हाल झाले. शहरातील सर्व नालेसफाई केल्याचे पालिकेचे दावे या पावसाने फोल ठरवले. मिलन सब वे, धारावी, दादर, हिंदमाता, परळ, कुर्ला, चुनाभट्टी या परिसरातील सखल भागास अक्षरश: तलावाचे स्वरुप आले होते. घाटकोपर येथे नाला फुटून पाणी रस्त्यावर आल्याने एलबीएस रोडचा संपूण भाग जलमय झाला होता.

दोन मुले बुडाली
कुर्ला येथील बैलबाजार परिसरातील दोन मुले मिठी नदीत वाहून गेली असून त्यांचा शोध सुरू आहे. बुधवारी सकाळपासूनच दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे मिठी नदीला चांगले पाणी आले आहे. उत्साहाच्या भरात कुर्ल्यातील बैलबाजार परिसरातील दोन मुले मिठी नदीत पोहण्यासाठी उतरली होती. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही वाहून गेले. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना, अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली.
(फोटो - मुंबईतील युवतींनी बुधवारी नरिमन पॉइंट परिसरातील समुद्रकिनारी पावसाचा आनंद लुटला)