आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईच्या काही भागांमध्ये रविवारी सायंकाळी तुरळक, तर काही भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. चार महिन्यांपासून घामाच्या धारांनी त्रस्त झालेले मुंबईकर या मान्सूनपूर्व पावसाने थोडे सुखावले. विशेषत: ठाणे व उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावत रस्ते भिजवून टाकले. विक्रोळीपासून ठाण्यापर्यंत तर पश्चिम उपनगरांमध्ये बोरिवली, कांदिवली भागांतही पावसाचा शिडकावा झाला.
गेले काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना आता पावसाच्या तुरळक का होईना सरींनी थोडा दिलासा मिळाला. हा पाऊस फार काळ टिकला नसला तरी रविवारच्या सुटीनिमित्त बाहेर पडलेल्या लोकांची थोडी पंचाईत झाली. रस्ते भिजून गेले, फेरीवाल्यांना तात्पुरता आधार शोधावा लागला. मुंबईच्या इतर भागांमध्ये कडाडणार्‍या विजांमुळे पावसाळी वातावरण तयार झाले होते.

नाले गाळातच; सफाई संपेना
पावसाळा तोंडावर आला तरी मुंबईतील नालेसफाई मात्र अजून रडतखडत सुरूच आहे. नालेसफाईची कंत्राटे विलंबाने दिल्यामुळे यंदा पावसापूर्वी हे काम पूर्ण होणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात 135 मोठे तर 340 छोटे असे 328 कि. मी. लांबीचे नाले आहेत. मिठी नदीचा प्रवाह 18 कि. मी. शहरातून जातो. यंदा महापालिकेने नालेसफाई आणि पूर आपत्कालीन आराखड्यासाठी 52 कंत्राटदार नेमले असून त्यांना 160 कोटींची कामे दिली आहेत. 7 मे रोजी सुरू करण्यात आलेली नालेसफाईची कामे 6 जूनपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. आजपर्यंत केवळ 55 टक्के नालेसफाई पार पडली असून 2 लाख चौरस घनमीटर इतका गाळ उपसण्यात आला आहे. रेल्वे हद्दीतील नालेसफाईसाठी पालिकेने रेल्वेला दोन कोटी रुपये दिले आहेत. प्रत्यक्षात तेथील सफाई धीम्या गतीने सुरू आहे.