आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौटुंबीक भेटीच्या नावाखाली उद्धव-राज यांनी मारले एका दगडात अनेक पक्षी, वाचा कारणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी अचानक ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंमध्ये सुरू असलेल्या न्यायालयीन वादात शिष्टाई करण्यासाठी राज यांनी उद्धव यांची भेट घेतल्याचा तर्क व्यक्त केला जात आहे. या भेटीबाबत दोघांपैकी कोणीही अधिकृत भाष्य जरी केले नसले तरीही, सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

मुंबईच्या दादर भागातील कृष्णकुंजमधून राज स्वत: कार चालवत शुक्रवारी मातोश्रीवर पोहोचले. सत्तेत एकत्र असूनही शिवसेना- भाजपमधील वाढता तणाव,महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या तोंडावर आलेल्या निवडणुका आणि उद्धव- जयदेव ठाकरे या दोन भावांतील वाद या पार्श्वभूमीवर राज नेमके कोणत्या कारणासाठी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले याबाबत अनेक तर्क लढवले जात आहेत. दोघांनीही या भेटीबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्यामुळे सस्पेन्स अधिकच वाढला आहे.

सध्या मुंबई उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्यादरम्यान बाळासाहेबांच्या मृत्युपत्राचा वाद सुरू आहे. बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसात त्यांच्या आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी मृत्युपत्र तयार करून त्यावर बाळासाहेबांच्या सह्या घेतल्याचा आरोप जयदेव यांनी केला. त्यावरून न्यायालयासमक्ष झालेल्या उलटतपासणीत तर जयदेव ठाकरे यांनी अनेक धक्कादायक विधाने केली आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे ठाकरे घराण्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याने व्यथित झाल्यानेच राज यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

भेट जरी कौटंुबिक कारणास्तव असल्याचे सांगितले जात असले तरीही या भेटी दरम्यान सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबतही चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे यासारख्या राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुकांच्या तोंडावर ही भेट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. भाजपच्या गोटात याबाबत सावध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असून ही “एक राजकीय भेट’ असल्याची सूचक प्रतिक्रिया प्रदेश भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे. शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांत मात्र या भेटीमुळे उत्साहाचे वातावरण आहे. मातोश्रीच्या अगदी जवळ असलेल्या शिवसेनच्या एका आमदाराला कौटंुबिक शिष्टाईबाबत विचारले असता त्याने नाव घेण्याच्या अटीवर बोलताना राज ठाकरेंच्या शिष्टाई बाबतची शक्यता साफ फेटाळून लावली आहे.
त्याने सांगितले की, जयदेव आणि उद्धव ठाकरे यांच्या न्यायालयीन वादात राज ठाकरेंची काहीही भूमिका नाही. तर या भेटीबाबत बोलताना बाळा नांदगावकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ते दोघे भेटले याचा दोन्ही पक्षातील सर्वांनाच आनंद झाला आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त आनंद मला झाला आहे. कारण गेली कित्येक वर्षे मी ठाकरे घराण्याच्या अगदी जवळ वावरलो आहे. त्यांच्या चर्चेदरम्यान आपण उपस्थित नसल्याने चर्चेचा तपशील सांगू शकणार नाही. ते दोघे भाऊ आहेतच, मात्र त्या सोबतच ते राज्यातील दोन प्रमुख राजकीय नेते आहेत. आपापल्या पक्षाचे प्रमुख आहेत, असे सूचक वक्तव्य करत नांदगावकर यांनी राजकीय चर्चेला आणखी हवा दिली आहे.
भेटीचे नेमके ‘राज’ काय?
अंदाज १ : बाळासाहेबांच्या मृत्युपत्रावरून सध्या उद्धव आणि जयदेव यांच्यात वाद सुरू आहे. त्यातच जयदेव यांनी न्यायालयात अनेक धक्कादायक विधाने केली आहेत. त्यामुळे ठाकरे घराण्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याने हे प्रकरण न्यायालयाबाहेरच मिटवावे, यासाठी दोन भावांत शिष्टाई करण्यासाठी राज मातोश्रीवर गेले होते.

अंदाज २ : भेट कौटुंबिक असली तरी ती मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर घडून आल्याने दोन भावांनी राजकीय चर्चा केली असणार. भाजपने मुंबईत शिवसेनेविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे आणि मनसेचा राजकीय परफॉर्मन्सही घसरणीला लागला आहे. त्यामुळे भाजपला इशारा देण्यासाठी राज मातोश्रीवर गेले.

अंदाज ३ : शिवसेनेतून बाहेर पडून २००५ मध्ये राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केलेली असली तरी उद्धव- राज एकत्र येणार अशी चर्चा अधूनमधून होत असते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर दोघांमध्ये युतीच्या शक्यतेची चर्चा घडवून मनसे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांत उत्साह आणण्याचा हा प्रयत्न आहे.
अंदाज 4 : भाजपने राष्ट्रवादी आणि इतर लहान पक्षांसोबत आघाडी करत शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विचार केला तर पक्षाला मरगळ आली आहे. त्यामुळे परस्पर हीत लक्षात घेऊन उद्धव आणि राज यांनी भेट घेतली असावी. त्यातून भाजप आणि इतर लहान पक्षांवर दबाव निर्माण झाला आहे.
विश्लेषण: भावांत वितुष्ट नसल्याचा संदेश
राज-उद्धव यांच्या भेटीला जर फक्त कौटुंबिकच कारण असते तर ही भेट माध्यमांपासून दूर एखाद्या तटस्थ अशा ठिकाणी (अन्य देशात किंवा हॉटेलमध्ये) घेता आली असती. मात्र, आपण दोन्ही भावंडांमध्ये कोणतेही वितुष्ट नसल्याचा संदेश दोघांकडूनही कार्यकर्त्यांपर्यंत पोहाेचवायचा असल्याने कदाचित ही भेट असू शकते. उघडपणे भेट घेण्यामागे पुढील व्यूहरचना कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणे हेसुद्धा एक कारण असण्यास शंका नाही. शिवाय, शिवसेना आणि राज ठाकरे या ब्रँडबद्दल लोकांमध्ये जी गुडविलची भावना आहे. ती भावना कायम ठेवण्याचा उद्देशही यातून साधला गेला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, मातोश्रीवरील बंधूभेटीत काय काय घडलं. याआधी कधी झाली होती भेट..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...