आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackarey News In Marath, Vinod Tawade, Maharashtra Navnirman Sena

नितीन गडकरींपाठोपाठ तावडेही राज यांच्या दारी, भाजपला मदत करण्‍याचे साकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यापाठोपाठ आता विरोधी पक्षनेते विनोद तावडे व मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या पक्षातील दोन नेत्यांनीही शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे हजेरी लावली. 20 मार्च रोजी होणार्‍या विधान परिषद निवडणुकीत मनसे आमदारांनी भाजपला मदत करावी, यासाठी राज यांना साकडे घालण्यात आले. मात्र, मनसेने अद्याप आपला निर्णय कळवलेला नाही.


भाजपचे विनोद तावडे आणि पांडुरंग फुंडकर व शिवसेनेच्या नीलम गोर्‍हे यांची आमदारकीची मुदत संपली आहे. शिवसेनेने रिक्त होणार्‍या एका उमेदवाराऐवजी गोर्‍हे यांच्यासह राहुल नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
परिषदेत एक उमेदवार निवडून आणण्यासाठी 29 मते लागतात. भाजपकडे 47 मते असून त्यांचाही एक आमदार निवडून येऊन 18 मते शिल्लक राहतात. शिवसेनेकडे 45 आमदार असून एक उमेदवार निवडून आणल्यानंतरही 16 मते शिल्लक राहतात. दोन्ही पक्षांच्या शिल्लक मतांची बेरीज केल्यास युतीचा आणखी एक उमेदवार निवडून येईल; पण त्यासाठी एकत्रित नियोजन आवश्यक असताना शिवसेनेने परस्पर दोन उमेदवार उभे केल्याने भाजपमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आता भाजपने आपल्या दुसर्‍या उमेदवारासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.


शिवसेनेवर भाजपची नाराजी
कोणतीही सल्लामसलत न करता शिवसेनेने विधान परिषदेसाठी दोन उमेदवार उभे केल्याने भाजप नेते उद्धव ठाकरेंवर नाराज आहेत. आता भाजपनेही आपले वेगळे प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून तावडे आणि शेलार यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. या निवडणुकीत मनसेने भाजपच्या दुसर्‍या उमेदवाराला मतदान करावे, अशी विनंती राज ठाकरे यांना केल्याचे तावडे म्हणाले.