आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज-बिग बींचा ‘सिलसिला’ सपा, काँग्रेसला रुचेना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रांतवादाचे संकुचित राजकारण करणार्‍या ‘मनसे’च्या कार्यक्रमात सहभागी होऊन अमिताभ बच्चन यांनी समस्त उत्तर भारतीयांना अपमानित केले आहे. महानायकाच्या या कृत्यानंतर कोणताही भैया त्यांना माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मंगळवारी दिली.
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या मेळाव्यात अमिताभ प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. त्यावर आक्षेप घेत आझमी यांनी बिग बींवरही सडकून टीकाही केली. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय आणि हिंदी भाषेचा कायम व्देष केला आहे.
मनसे कार्यकर्त्यांनी हजारो उत्तर भारतीयांवर हल्ले केल्याचेही ते म्हणाले.
अशा पक्षाच्या व्यासपीठावर उत्तर भारतीय असणारे अमिताभ कसे काय हजेरी लावतात, असा सवाल त्यांनी केला. राज अद्यापही मराठीच्या मुद्यावर ठाम आहेत. मग, अमिताभ यांना तडजोड करण्याची गरज काय? असा प्रशन त्यांनी उपस्थित केला.
अमिताभ या कार्यक्रमात कलाकाराच्या नात्याने गेले होते. ‘सपा’ खासदार जया बच्चन यांचा याप्रकरणी कोणताही दोष नाही. त्यामुळे सपाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांच्याकडे तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही, अशी सारावासारवही त्यांनी केली.
राज यांना काँग्रेसचा टोला
उत्तर भारतीयांसमोर ‘मनसे’ला अशा पद्धतीने लोटागणच घालायचे होते तर कामाच्या शोधात मुंबईला आलेल्या गोरगरिबांची डोकी का फोडली, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला. ‘आप’च्या यशामुळे राज चिंताग्रस्त आहेत. उत्तर भारतीय मतांचे महत्त्व उमगल्याने मनसेला ही उपरती झाली आहे, असा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.