आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Raj Thackeray And CM Pruthviraj Chavan Meeting News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

28 टोलनाके बंद; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘10 कोटी रुपये खर्चाच्या आतील राज्यातील 28 टोलनाके बंद करण्याबरोबरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी नवे टोलधोरण आणले जाईल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिष्टमंडळाला दिले. विशेष म्हणजे टोलच्या मुद्दय़ावर एकमेकांवर जाहीरपणे तोंडसुख घेणारे ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ या बैठकीत एकमेकांच्या शेजारीच बसले होते, मात्र यावेळी त्यांनी एकमेकांशी बोलणे मात्र टाळल्याचे प्रकर्षाने उपस्थितांच्या लक्षात आले.

टोल धोरणातील त्रुटींवर सहय़ाद्री अतिथीगृहावर राज आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली. राज यांनी काही वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रांचे संपादक आणि टोल विषयातील तज्ज्ञांना सोबत नेले होते. राज यांनी आपले मुद्दे मांडले. त्यांच्यासोबतचे संजीव शिरोडकर यांनीही सध्याच्या धोरणातील त्रुटी दाखवून दिल्या. खरे तर ही संपूर्ण चर्चा बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याशी व्हायला हवी होती. परंतु राज व भुजबळ एकमेकांकडे पाहतही नव्हते. चर्चा संपल्यावर सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले, पण राज आणि भुजबळ यांनी मात्र परस्परांना टाळणेच पसंत केले, असे बैठकीस उपस्थित असलेल्यांनी सांगितले. मनसेच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण बैठकीदरम्यान भाष्य केले नसले तरी बैठक संपताना दिलेली आश्वासने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पूर्ण करू, कारण आम्हालाही या मुद्दयाचे थोडेसे पोलिटीकल मायलेज घ्यावेच लागेल , असा टोला त्यांनी राज यांना लगावला. या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी मनसेला झुकते माप देत राष्ट्रवादीच्या दोन्ही मंत्र्यांची कोंडीचा प्रयत्न केला.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, 10 कोटी इतकी प्रकल्प किंमत असलेले राज्यातील 12 टोल नाके युतीच्या काळातले आहेत. तर 14 नाके आघाडी सरकारच्या काळातले आहेत. 2004 नंतर कोणतेही नवे टोल नाके उभारले नाहीत. 285 कोटी रुपये जर सरकारने दिले तर हे सगळे नाके आम्ही बंद करू.

मुख्यमंत्र्यांनी मांडलेले मुद्दे
0 नव्या धोरणात एसटीला टोल सवलत देणार
0 नाक्यावर शौचालये उभारणे बंधनकारक.
0 वाहनांची संख्या मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स सिस्टिम उभारणार
0 दोन कोटीच्या आतील नाके बंद करण्यास किती खर्च लागेल याचा आढावा सुरू आहे.
0 ई-महापास योजना सुरू करणार
0 महामार्गांवर अपघात वाढल्याबद्दलही चिंता
0 वादग्रस्त नाक्यांचे ऑडिट करण्याचा विचार.
0 किती किमीवर व किती वर्षासाठी टोल ठेवावा याचे नियम न करणे ही चूक झाली.
0 व्हीआयपींच्या नावाखाली किंवा सूट असलेल्या गाड्यांच्या संख्येबाबत सादर केलेल्या माहितीचा विचार करावा लागेल.

भुजबळ यांचे मुद्दे
>बंद नाक्यांचे बांधकाम लगेच पाडून टाकणार
>वाढीव वाहनांच्या वसुलीत 75 टक्के सरकार, तर 25 टक्के वाटा कंत्राटदाराचा.

रद्द करण्यात आलेले बीओटी प्रकल्प
>चुबळी-फाटा-पाटोदा मौर्या इन्फ्रा 2.37 कोटी
>शिरुर-ताजबंद-मुखेड कल्याण टोल 8.18 कोटी
>औंढा-चोंढी-वसमत कल्याण टोल 5.50 कोटी
>तुळजापूर-उजनी शिवरत्न इन्फ्रा 8.00 कोटी
>तुळजापूर-नळदुर्ग लोकमंगल इन्फ्रा 3.82 कोटी