सावंतवाडी- राज्यातील सर्व बड्या नेत्यांसह छोट्या-मोठ्या पदाधिका-यांनीही कोकणातील हजारो एकर जमिनी घेऊन ठेवल्या आहेत असा आरोप मनसेप्रमुख राज ठाकरेंनी कोकणातील सावंतवाडी येथे केले. राज ठाकरेंनी पक्षाचे उमेदवार परशुराम उपरकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रासारख्या समृद्ध राज्यांची येथील प्रमुख राज्यकर्त्यांनी वाट लावून टाकली आहे. इतका सुंदर कोकण भग्न करून टाकला आहे. राज्यकर्ते येथे खाणकाम करीत आहेत, डोंगर कापत आहेत आणि पैसे मिळवत आहेत. येथील शेजारचे राज्य गोवा पाहा. तेथील संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटनावर चालते. गोव्यात वर्षाला वेगवेगळ्या देशातील खासगी लोकांची सुमारे 1000 ते 1200 विमाने येतात. किती मोठी अर्थव्यवस्था तयार होऊ शकते पर्यटनातून त्याचे उत्तम उदाहरण गोवा आहे.
आपल्या कोकणात, महाराष्ट्रात हे शक्य आहे. 720 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. पण त्याचा विकास करावा असे येथील ना सत्ताधा-यांना वाटते ना विरोधकांना. ते नुसते हजारो एकर जमिनी कोकणात खरेदी करीत सुटले आहेत, असा आरोपही राज यांनी केला.
भाजपवर हल्लाबोल करताना राज ठाकरे म्हणाले, या पक्षाची औकात नसताना स्वबळावर लढत आहे. इतर पक्षातील 60-60 उमेदवार आयात करून तिकीटे दिली. या पक्षाला काही नितिमत्ता राहिली नाही. सत्तेसाठी भाजप काहीही करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. सावंतवाडीतून मूळचे काँग्रेसचे राजन तेली यांनी राष्ट्रवादीत तिकीटासाठी प्रवेश केला. पण ऐनवेळी त्यांनी भाजपची उमेदवारी घेतल्याने तेलींवर राज यांनी टीका केली. हे काय हॉटेलचे हॉलिडे पॅकेज आहे का सात दिवस या पक्षात, उमेदवारीसाठी तिस-या पक्षात असे म्हणत हल्लाबोल केला.
माझ्या हातात एकदा राज्य देऊन बघा असे आवाहन करीत राज म्हणाले, जे झाले ते झाले. सगळ्यांना संधी देऊन पाहिली आता एकदा राज्य ठाकरेंना संधी देऊन तरी बघा. मी एक कलाकार, चित्रकार आहे. राज्याबाबत माझे काही आराखडे आहेत. कोकणाचा विकास कसा करता येईल, पर्यटन कसे वाढवता येईल याचा माझ्या विकास आराखड्यात सविस्तरपणे माहिती दिली आहे. ती एकदा जरूर वाचा, असे आवाहन परशुराम उपरकर यांना विजयी करण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले.