आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंची बहुचर्चित ब्ल्यू प्रिंट गणेशोत्सवापूर्वी येणार, रतन टाटा, अंबांनींना निमंत्रणाचे नियोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मनसेच्या बहुचर्चित ब्ल्यू प्रिंटला अखेर गणेशोत्सवापूर्वीचा मुहूर्त मिळाला आहे. आठ वर्षांपासून तयार केलेल्या या ब्ल्यू प्रिंटवर सध्या अखेरचा हात फिरवला जात असून त्यातील मुद्द्यांबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात येत आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे, ब्ल्यू प्रिंटसाठी काम करणारी टीम आणि पहिल्या फळीतील मनसे नेते यांच्याव्यतिरिक्त पक्षातील इतर कुणालाही याबाबत काहीच माहिती नाही.

पक्ष स्थापनेच्या वेळी राज ठाकरे यांनी घोषणा केलेली ब्ल्यू प्रिंट सादर होण्यास अखेर आठ वर्षे लागली. या ब्ल्यू प्रिंटबद्दल राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे. सध्या मुंबईच्या ताज लँड्स एंड आणि हॉटेल फोर सीझन्स या दोन पंचतारांकित हॉटेल्समध्ये यासाठी अखेरच्या बैठका होत आहेत. त्यात ब्ल्यू प्रिंटसाठी काम करणार्‍या टीमसोबत राज ठाकरे स्वत: प्रेझेंटेशनचे नियोजन करत आहेत. अगदी सूक्ष्म पातळीवर जाऊन नियोजन करण्यात येत असून काही त्रुटी राहू नयेत याचीही दक्षता घेण्यात येत आहे. गणपतीच्या आधी दणक्यात या ब्ल्यू प्रिंट प्रकाशनाचा राज यांचा विचार आहे.

रतन टाटा, अंबांनींना निमंत्रणाचे नियोजन
ब्लु प्रिंटचे प्रथम पक्षाच्या ज्येष्ठ नेते व पदाधिकार्‍यांसमोर सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर जनतेसाठी प्रकाशन करताना मेगा इव्हेंट करण्याचा प्रयत्न आहे. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानी आदी दिग्गजांना आमंत्रित करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे.

कशी असेल ब्ल्यू प्रिंट ?
आरोग्य, शिक्षण, रोजगार, कृषी, पायाभूत सुविधा, सिंचन, नगरविकास, उद्योग यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर सखोल अभ्यास करून, तसेच तज्ज्ञांशी सल्लामसलत करून पुढील 50 वर्षांचा विस्तृत आराखड्याचा ब्ल्यू प्रिंटमध्ये समावेश आहे. सध्या राज्यासमोर असलेल्या ज्वलंत समस्या आणि त्यावरच्या कायमस्वरूपी तोडग्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांबाबतही विस्ताराने विचार करण्यात आला आहे.

प्रत्त्युत्तर देणार : नांदगावकर
पक्षस्थापनेपासून राज ठाकरेंच्या मनात विकासाचे नियोजन आहे. या मुद्द्यावर गेली आठ वर्षे खिल्ली उडवणार्‍यांना ही ब्ल्यू प्रिंट म्हणजे चोख उत्तर असेल, असे आमदार बाळा नांदगावकर म्हणाले.