मुंबई- राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने 12 टोलनाके कायमचे बंद करून 53 टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट दिली असली तरी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे समाधान झाले नाही. 65 टोलनाके बंद केले त्याबद्दल फडणवीस सरकारचे अभिनंदन पण आजही टोलनाक्यांवर मोठा भ्रष्टाचार होत असून टोलवसुलीत पारदर्शकता नाही अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाचक टोल वसुली आणि त्यातील पारदर्शकतेचा अभाव या विरुद्ध मोठा संघर्ष उभारला होता आणि तो आजही चालू आहे. राज्य सरकारने आज अंशतः टोल माफीची घोषणा केली. याच विषयावर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी राज ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी राज ठाकरेंनी काही आक्षेप घेतले व
आपली भूमिका मांडली.
राज ठाकरे म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने बंद केलेल्या 40-45 टोल नाक्यांची घोषणा केली पण त्यांची नावे कोणती याची यादी बाहेर आली नाही. फडणवीस सरकार बंद करू इच्छित असलेले टोलनाके हे आघाडी सरकारने घोषणा केलेल्या टोलनाक्यापैकी नाहीत ना याची माहिती घ्यावी लागेल. जे सर्वात जाचक टोल म्हणून ओळखले जातात त्या मुंबई एन्ट्री पॉईंटचे टोल नाके, मुंबई-पुणे टोल, कोल्हापूर यांच्या बद्दल सरकारची भूमिका काय आहे ते स्पष्ट केले पाहिजे. नुसत्या पोकळ घोषणा करू नका तर सज्जड कृती करून दाखवा, असेही राज यांनी सांगितले.
टोलनाक्यांवर आजही मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे सांगून राज ठाकरे म्हणाले, प्रत्येक टोल नाक्यांवर किती पैसे जमा झाले आहेत याची माहिती का दिली जात नाही. ज्या ठिकाणी अतिरिक्त टोल जमा झाला आहे त्या अतिरिक्त पैश्याचे सरकार काय करणार आहे, याची माहिती लपविली जात आहे. या बाबतीतील पारदर्शकतेचे काय करायचे?. जगभरातल्या अनेक टोल नाक्यांवर कॅशच्या रुपात टोल वसूल केला जात नाही तर ई-कार्डनुसार केला जातो. ही पद्धत आपल्याकडे का येत नाही. या बाबी आणल्या तरी सर्व गोष्टी सुरळित होतील व पारदर्शकताही येईल असे राज यांनी सांगितले. मुख्य म्हणजे किती टोल वसूल झाला आहे हे आकडेवारी सांगणारे डिजिटल फलक का लावले जात नाहीत असा सवाल उपस्थित केला.
टोलानाक्यावरील गुंडगिरीबाबत राज म्हणाले, बाऊन्सर ठेवून टोल नाक्यावर वसुली केली जाते. हे बाऊन्सर दमदाटी करतात, मारहाण करतात हे काय चांगल्या राज्याचे लक्षण असू शकते का?. या सरकारला टोल धोरण कसे आखावे कळत नसेल तर आमचा (मनसेची ब्ल्यूप्रिंट) विकास आराखडा वाचा. तसेही अनेक निर्णय घेताना सरकार आमच्या विकास आराखड्याचा आधार घेते हे दिसत आहे ते चांगलेच आहे असा टोलाही त्यांनी हाणला. जाचक टोल विरुद्ध गेली 3 वर्षं आम्ही सरकार विरुद्ध कोर्टात लढतोय पण तारीखच मिळत नाही. कायदेशीर लढाई लढायची तरी कशी?. आज अंशतः टोल माफी झाल्यावर अनेक पक्ष विजयाच्या घोषणा देत आहेत पण आम्ही जेव्हा आंदोलन करत होतो तेव्हा इतर पक्ष कुठे होते? असा टोलाही राज यांनी भाजप-शिवसेनेला हाणला.